पिंपरी - इंडो सायकलिस्ट क्लबतर्फे पुणे-पंढरपूर-पुणे सायकल वारी यशस्वीरित्या पार पडली. सायकल वारीचे हे तिसरे वर्ष होते. या वर्षी सुमारे २२५ नागरिक सायकलवारीमध्ये सहभाग घेतला होता. वारीसाठी सुमारे तीन महिने आधीपासून नियोजन करण्यात आले होते. इंडो सायकलिस्ट या ग्रुपवर नियोजन समितीतर्फे सायकल वारीसाठी आवाहन व सूचना करण्यात आल्या होत्या.आय.सी.सी. डिव्होशनल सायकल राईडच्या नियोजन समितीमध्ये कोअर टीमचे गजानन खैरे, अजित पाटील, गणेश भुजबळ, विश्वकांत उपाध्याय, यतिश भट यांचा सहभाग होता़ तर कोअर स्पोर्ट टीममध्ये गिरिराज उमरीकर, सागर भुजबळ, शंकर उणेचा, दीपक नाईक, अविनाश अनुशे, श्रीकांत वत्स, श्रीकांत चौधरी, डॉ. अक्षय चौधरी, कपील पाटील, सुशील मोरे, ऋतुजा शिंदे, माधुरी शेलार, नकुल पिंगळे, पंढरी भुजबळ, देवेंद्र चिंचवडे, अभिजित चिटणीस, मोहीत देवरे, रोहन गान, विकास पाटील, अभयकुमार मगदूम, केदार देव, कालिदास शिंदे अशा अनुभवी टीमचा सहभाग होता. सायकलने पंढरपूरला जाण्याचा तीन वर्षांपूर्वी इंडो सायकलिस्ट क्लबने प्रयोग सुरू केला. अल्पावधीतच ही सायकल वारी संपूर्ण देशाचे आकर्षण झाली. दोन दिवसांत ४७० किलोमीटर हे आवाहन वारकऱ्यांनी स्वीकारून लीलया पार पाडले.शहरातील सायकलिस्ट सकाळी ४ वाजता निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात जमा झाले.पावसात भिजतच सायकलवारीला सुरुवात झाली. हडपसर येथे कपील लोखंडे व सौरभ कान्हेदे यांनी हडपसर ठिकाणाची संयोजनाची जबाबदारी पार पाडली. प्रत्येकी १० जणांचा ग्रुप करण्यात आला होता़ प्रत्येक ग्रुपला एक प्रमुख देण्यात आला होता.सायकलवर प्रवास करत असताना कुणालाही थकवा जाणवत नव्हता, कारण सर्वांनाच पंढरपूरची ओढ होती. वारीच्या प्रवासातील भिगवणचा संपूर्ण रोड हा चढ-उताराचा होता गावातले लोक मोठ्या उत्सुकतेने सायकलवारीकडेपाहत होते. सायंकाळी ७ वाजता सर्व जण सायकलवर पंढरपूरला पोहोचले.दुस-या दिवशी सकाळी ६ वाजता परतीचा प्रवास सुरू झाला. ऊन सावलीचा खेळ सुरू असताना माळशिरस-फलटण-लोणंद-नीरा-जेजुरी-सासवड-हडपसर असा प्रवास पूर्ण केला. अशा प्रकारे दोन दिवसांत सायकल वारी पूर्ण केली.
पंढरपूर सायकल वारी दोन दिवसांत पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 2:05 AM