पिंपरी : हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य पांडुरंग खंडुजी जगताप (वय ८५) यांचे बुधवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, उद्योजक विजय जगताप, चंद्ररंग डेव्हलपर्सचे प्रमुख माजी नगरसेवक शंकर जगताप यांचे ते वडील होत. पांडुरंग जगताप यांनी हवेली तालुका पंचायत समितीचे सदस्यपद भूषविले होते. विविध सामाजिक, धार्मिक कामात पुढाकार घेणारे, वारकरी संप्रदायाशी जोडलेले, मदतप्रिय, शिस्तप्रिय आणि नेहमी इतरांना प्रोत्साहन देणारे हे व्यक्तिमत्त्व होते. पिंपळे गुरव येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी महापौर शकुंतला धराडे, खासदार अमर साबळे, आमदार अनिल भोसले, आरएसएसचे अप्पा गवारे, लोकलेखा समितीचे सचिन पटवर्धन, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, बापू पठारे, विनायक निम्हण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेनेचे प्रमुख राहुल कलाटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, माजी महापौर आझम पानसरे, नाट्य परिषदेचे भाऊसाहेब भोईर आदी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. (प्रतिनिधी)
पांडुरंग जगताप यांचे निधन
By admin | Published: October 06, 2016 2:43 AM