पिंपरी : संतांच्या ब्रह्मभावाचे प्रतीक म्हणून पांडुरंग आहे. तो एकीकडे ब्रह्मभावाचे रूप आहे. तर दुसरीकडे सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. दर्शनरूपाने तो योगमूर्ती आहे. तत्त्व रूपाने ज्ञानमूर्ती आहे. भावरूप भगवंतमूर्ती आहे. तो महाराष्ट्राचा खरा लोकदेव आहे, असे मत संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील दशमी सोहळ्यात संत साहित्याचे गाढे अभ्यासक विद्यावाचस्पती हभप रामचंद्र देखणे यांची प्रवचन सेवा झाली. त्यांनी संतश्रेष्ठ तुकोबारायांचे भक्तितत्त्व मांडले. डॉ. देखणे म्हणाले, ‘‘भावरूप म्हणजे आई-वडील होय. तुकोबारायांनी भंडारा डोंगरावर जे चिंतन केले ते केवळ एकांतात म्हणून नव्हे तर ज्ञानदेवांच्या चिद्विलास तत्त्वाप्रमाणे निसर्गातल्या प्रत्येक घटकांशी एकरूप होऊन परमात्मातत्त्व अनुभवले. त्यातूनच चित्ताची एकाग्रता समत्व दृष्टी, आणि जीवनाची परिमितता उभी राहिली आणि तुकोबांच्या मुखातून अमृतवाणी बोलू लागली.’’ या वेळी सोहळ्याचे प्रमुख बाळासाहेब काशिद यांनी डॉ. देखणे यांचा सत्कार केला. (प्रतिनिधी)
ब्रह्मभावाचे प्रतीक पांडुरंग
By admin | Published: February 06, 2017 6:03 AM