पवनानगर : मावळ तालुक्यातील पश्चिम बाजूला असलेल्या पवन मावळ परिसरामध्ये बेचाळीस गावांची व वाड्यावस्तीची बाजारपेठ असलेले एक पवनानगर शहर. परंतु या ठिकाणी रस्त्यावरच पाणी साचल्याने वाहनचालकांची दमछाक होत आहे.
पवनानगरमध्ये रोज नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या ठिकाणी उच्च माध्यमिक शाळा, कॉलेज, महसूल विभागाची सर्व कार्यालये, खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यालय अशी अनेक महत्त्वाची कार्यालये असून, परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिक शासकीय व दळणवळणाची सोय असल्याने या ठिकाणी येत असतात. परंतु पवनानगर ते महागाव रस्ताच्या कडेला मोठ्या प्रमाणावर पाटबंधारे विभागाच्या जागेवर बेकायदा अतिक्रमण करण्यात आले आहे. अधिकारी मात्र राजकीय नेत्यांना बळी पडून अतिक्रमण काढण्यासाठी मागे पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चौकामध्ये जोरदार पाऊस झाल्याने चौकामध्ये मोठ्या प्रमाणावर काले कॉलनी पोलीस मदत केंद्राच्या ठिकाणी पाणी साचत असते. त्यामुळे या ठिकाणी स्थानिक व बाहेरील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करत ये-जा करावी लागत आहे. या रस्त्यावर अनेक महिन्यांपासून पावसाळ्यात पाणी साचल्याने मोठमोठे खड्डे पडल्याने या ठिकाणाहून ये-जा करण्यासाठी विद्यार्थ्यांना कसरत करावी लागत आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभागाच्या व काले पवनानगर ग्रामपंचायत अंतर्गत येत असल्याने रस्ता कोणी करायचा यावरही अनेकदा राजकारण करण्यात आले आहे. परंतु रस्त्याच्या कडेला असलेल्या पाटबंधारे विभागाच्या जागेमध्ये जे अतिक्रमण झाले आहे, ते काढून रस्ता नागरिकांना ये-जा करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावा, असे नागरिक सांगत आहेत. हा रस्ता पवनमावळ परिसरातील महागाव, धालेवाडी, प्रभाची वाडी, सावंतवाडी, दत्तवाडी, मालेवाडी,निकमवाडी या गावांना व बेचाळीस गावांच्या सरकारी आॅफिस,पवना ज्युनिअर कॉलेज, संकल्प इंग्लिश स्कूल,पवना वसाहत या ठिकाणी जात आहे. तरी याकडे कोणत्याही विभागाचे लक्ष नसल्याने नागरिकांमधून मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त केला जात आहे.