पिंपरी : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला जीएसटी आयुक्तालयाने १९ कोटी रुपयांच्या जीएसटीप्रकरणी नोटीस बजावली. त्यामुळे पंकजा मुंडे अडचणीत सापडल्या आहेत. राज्यभरातील त्यांच्या समर्थकांनी या कारवाई विरोधात रस्त्यावर उतरत वर्गणी जमा करण्यास सुरूवात केली आहे. मात्र, पिंपरी चिंचवड शहरातील मुंडे गट याला अपवाद असून पंकजा मुंडे संकटात सापडल्यानंतरही शहरातील मुंडे गट कोसो दूर आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजप पक्ष जसा वाढत गेला तसेच गट देखील वाढत केले. नवीन नेत्यानुसार नवीन गट होऊ लागला. सन २०१४ नंतर शहरामध्ये दोन गट उदयास आले. एक भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचा तर दुसरा दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा गट तयार झाला. मात्र, गोपीनाथ मुंडे यांना मानणाऱ्या वर्गाने स्वतंत्र राहणेच पसंत केले. त्यामध्ये पक्षातील बहुतांश जुन्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांना भाजपामध्ये जाणूनबुजून डावलले जात असल्याचा आरोप राज्यभरातील मुंडे समर्थक करत आहेत. त्यातच त्यांच्या कारखान्याला नोटीस आल्याने समर्थक आर्थिक मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. पन्नास हजार रुपयांपासून ते दोन लाख रुपयांपर्यंतचे धनादेश समर्थकांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या नावाने तयार केले आहेत. तसेच ठिक-ठिकाणी रस्त्यावर उतरत समर्थनार्थ आंदोलन सुरू आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील मुंडे गट मात्र निपचित आहे. शहरातील मुंडे समर्थकांमध्ये मरगळ असून पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ एकही पदाधिकारी रस्त्यावर आला नाही. त्यामुळे पंकजा मुंडे अडचणीत असतानाही शहरातील मुंडे गट त्यांच्यापासून एवढा दूर का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
शिवशक्तीपासूनही दूर-
नुकतीच पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा पार पडली. यावेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी शहरातील समर्थक उपस्थित नव्हते. भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या निवासस्थानी शहराध्यक्षांनी त्यांचे फक्त स्वागत केले. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांना मानणारा शहरातील भाजपामधील गट नेमका कुठे आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पक्ष सोडणार नसल्यावर समर्थक ठाम-भाजपाचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे हे पंकजा मुंडे यांच्या जवळचे आहेत. ते म्हणाले, पंकजा मुंडे पक्ष सोडणार नाहीत. त्यांच्याकडे देशपातळीवरील जबाबदारी आहे. त्यांना योग्य न्याय मिळेल.