तळेगाव दाभाडे : मजुराच्या घरासमोर मध्यरात्री अज्ञातांनी तीन महिन्यांच्या तान्ह्या बाळाला सोडले. बाळाच्या रडण्याने जाग आल्याने घरातील मंडळींनी बाळाला घरात घेऊन माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले.
मल्हारी सायबू धनवटे (वय ५१, रा. सदाफुली, पो. सुदुंबरे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मल्हारी मजुरीचे काम करतात. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या घरातील सर्वजण झोपले. शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास अज्ञातांनी त्यांच्या घरासमोर तीन महिने वयाचे एक पुरुष जातीचे बाळ कपड्यात गुंडाळून ठेवले. त्या बाळाच्या रडण्याच्या आवाजाने मल्हारी यांना जाग आली. त्यांनी घर उघडून बाहेर बघितले असता त्यांच्या घराच्या दरवाजाच्या पायरीवर एक तान्हे बाळ रडत असल्याचे दिसले. त्यांनी बाळाला उचलून घेतले. शनिवारी याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. बाळाच्या मातापित्याचा तळेगाव एमआयडीसी पोलीस शोध घेत आहेत.