पिंपरी : क्रिएटिव्ह अकॅडमीमध्ये प्रवेश घेण्यासाठी अनेकांनी फी भरली आहे. मात्र अकॅडमीच्या संचालकावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने त्याला अटक झाली. त्यामुळे आम्ही भरलेली फी परत द्या, अशा मागणीसाठी पालकांनी पोलिस आयुक्त कार्यालयावर शुक्रवारी (दि. ५) मोर्चा काढला.
रावेत येथील क्रिएटिव्ह अकॅडमीचा संचालक नौशाद शेख याच्यावर काही दिवसांपूर्वी विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा गुन्हा दाखल झाला. त्यात त्याला अटक झाली असून तो सध्या कारागृहात आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी अनेक पालकांनी फी भरली आहे. एका विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी लाखो रुपये फी आहे. पालकांचे फी स्वरूपात कोट्यावधी रुपये क्रिएटिव्ह अकॅडमीमध्ये अडकले आहेत. ते पैसे परत मिळावेत यासाठी संबंधित पालकांनी शुक्रवारी दुपारी पोलिस आयुक्त कार्यालय गाठले. आम्ही भरलेली फी परत मिळावी. तसेच संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पालकांनी केली. सहायक पोलिस आयुक्त राजू मोरे, चिंचवडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी, रावेतचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र कदम यांनी पालकांची समजूत काढली.
पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांना भेटण्याची मागणी सर्व पालकांनी केली. त्यानंतर संजय देवरे, गणेश शेळके, निलेश भामरे, भरत बारराव हे पालकांचे शिष्टमंडळ पोलिस आयुक्तांना भेटले. पालकांनी शिक्षण मंडळाकडे अर्ज करावा. शिक्षण मंडळाकडून आलेल्या अहवालाची पोलिस अंमलबजावणी करतील, अशी ग्वाही पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पालकांना दिली.