पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या सहा महिन्यांत २४२ अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता झाली आहेत. त्यातील काही मुलांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. तर काहीजण अद्याप बेपत्ताच आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे. पोलीस तपासामध्ये मुले बेपत्ता होण्यामागील विविध कारणे समोर येत आहेत.
पालकांची शिस्त, अभ्यासासाठी दबाव, घरात सतत होणारे वाद, बाह्य जगाचे आकर्षण, शिक्षणाची भीती, सोशल मीडिया आणि चित्रपटात रंगवलेले आभासी जग अशी प्रमुख कारणे मुलांच्या घर सोडण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे तपासांमध्ये दिसून आले आहे.
कोरोना काळात शिक्षण ऑनलाइन झाले होते. परिणामी बहुतेक विद्यार्थ्यांकडे मोबाइल आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत संपर्कात असल्याने मुले प्रेम प्रकरणाच्या जाळ्यात अडकल्याचे वास्तव पोलीस तपासात समोर आले आहे. मुले बेपत्ता झाल्यास पालकांकडून शोध घेतला जातो. त्यानंतर पोलिसात तक्रार दिली जाते. अशा प्रकरणात थेट अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात येतो.
घर सोडून गेलेली मुले-मुली काही दिवसांत घरच्यांना, मित्रांना, जवळच्या व्यक्तींशी संपर्क साधतात. त्यांची समजूत काढून त्यांना पुन्हा घरी बोलावले जाते, असेही तपासात दिसून आले आहे. त्याचबरोबर लहान मुलांचे अपहरण करून खून केल्याचा प्रकार शहरात नुकताच घडला आहे. त्यासोबतच काही किरकोळ कारणांमुळे मुले घर सोडून जातात, असेही प्रकार घडले आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
बेपत्ता अल्पवयीन मुले
जानेवारी - ३३
फेब्रुवारी - ३१
मार्च - ४६
एप्रिल - ५३
मे - ४३
जून - ३६
एकूण २४२
पालकांनी घ्यावयाची काळजी-
- मुलांचे मोबाइल वेळोवेळी तपासा
- मुलांच्या मित्र-मैत्रिणींची माहिती ठेवा.
- मुलांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे द्या.
चित्रपट, मालिकांमधील अनुकरण धोकादायक
चित्रपट आणि मालिकांमध्ये अनेकवेळा गुन्हेगारीचे दृश्य दाखवले जाते. याचा परिणाम मुलांच्या मनावर होते. दाखवलेल्या दृश्याप्रमाणे मुले अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. परंतु चुकीच्या गोष्टीचे अनुकरण करणे मुलांच्या आयुष्यासाठी धोकादायक असते. याची कल्पना मुलांना नसते. त्यामुळे मुले लहान वयात घर सोडून जातात. किंवा गुन्हेगारीचे कृत्य करतात, असे काही घटनांमध्ये समोर आले आहे.
मुलांना एकटे सोडू नये. मुले वयात आले की त्यांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटते. त्यामुळे देखील अनेक वेळा मुले घर सोडून जातात. मुले आणि पालक यांच्यामध्ये संवाद असणे आवश्यक आहे.
- डॉ. सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड