पिंपरी : हॉटेलच्या स्मोकिंग झोनमध्ये धुम्रपान करण्यासाठी गेलेल्या ग्राहकाने तिथे खेळत असलेल्या लहान मुलांना वेटरला सांगून बाहेर पाठवले. त्याचा राग मनात धरून मुलांच्या पालकांनी त्या व्यक्तीला मारहाण केली. सुतारवाडी पाषाण येथील पंजाबिझ हॉटेल येथे शनिवारी (दि. १४) रात्री पावणे दहाच्या सुमारास ही घटना घडली.
निरंजन संजीवन हर्षे (४२, रा. औंध, पुणे) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. १५) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार स्वप्नील शंकर बिराजदार (४०, रा. वाकड), श्लोक सुदेश होणराव (२७, रा. वडगाव, पुणे), सिद्धार्थ संतोष होणराव (३६, रा. गुलटेकडी), सम्राट सतीश होणराव (३४, रा. गुलटेकडी), शंतनू संदीप होणराव (३१, रा. स्वारगेट) यांच्यासह इतर दोन अनोळखी इसमांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हर्षे हे त्यांची मैत्रीण आणि पत्नीसोबत पाषाण येथील पंजाबिझ हॉटेल येथे जेवण करण्यासाठी गेले. जेवण करण्यापूर्वी ते हॉटेलमधील स्मोकिंग झोनमध्ये सिगारेट पिण्यासाठी गेले. त्यावेळी तिथे लहान मुले खेळत होती. त्यामुळे हर्षे यांनी वेटरला आवाज देऊन लहान मुलांना बाहेर पाठवले. त्यानुसार वेटरने लहान मुलांना खाली पाठवले. त्यानंतर मुलांचे पालक तेथे आले. त्यांच्या मुलांना खाली पाठवल्याने त्यांना राग आला. त्या रागातून त्यांनी फिर्यादी हर्षे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हर्षे यांची पत्नी भांडण सोडविण्यासाठी आली असता त्यांना धक्का दिला. हर्षे यांच्या मैत्रिणीला शिवीगाळ केली. तसेच हर्षे यांच्या मित्राच्या डोक्यात काहीतरी फेकून मारून दुखापत केली. ‘तुला जिवंत सोडणार नाही’, अशी धमकीही फिर्यादी हर्षे यांना दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.