पुणे - मुलांना पूर्वप्राथमिकसाठी (नर्सरी, एलकेजी) तसेच प्राथमिकच्या इयत्तांसाठी शाळेत प्रवेश मिळवणे हे दिवसेंदिवस पालकांसमोरचे सर्वांत कठीण आव्हान बनत चालले आहे. महागड्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेतच प्रवेश मिळविण्याचा अट्टहास, प्रवेशाच्या जागा मर्यादित असणे, डिसेंबरपूर्वीच प्रवेशप्रक्रिया पूर्ण होणे यामुळे मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी पालकांची दमछाक उडत आहे.शहरातील बहुतांश इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी पुढील वर्षीच्या (२०१८-१९) प्रवेशाची प्रक्रिया डिसेंबर २०१७मध्ये सुरू करून ती जानेवारी २०१८ पूर्वीच संपविली आहे. मात्र तरीही अनेक मुलांना अद्याप पूर्व प्राथमिकसाठी प्रवेश मिळालेला नाही. शाळेसमोर प्रवेशअर्ज घेण्यासाठी पहाटेपासून रांग लावून, आॅनलाइन फॉर्म भरण्याची किचकट प्रक्रिया पार पाडूनही अनेक पालकांच्या मुलांना प्रवेश मिळू शकलेला नाही. ज्या मुलांना प्राथमिक व त्या पुढील इयत्तांसाठी प्रवेश घ्यायचा असेल, तर परिस्थिती आणखीनच वाईट आहे. कारण बहुतांश शाळांच्या प्रवेश नर्सरीमध्येच पूर्ण झालेले असतात, त्यामुळे पुढील इयत्तांचे प्रवेश हे एखादा मुलगा शाळा सोडून गेल्यामुळे जागा रिक्त झाली, तरच मिळण्याची शक्यता असते. शालेय प्रवेश प्रक्रिया, विद्यार्थ्यांकडून घ्यावयाचे शुल्क या संदर्भात राज्य सरकारने नियम ठरवून दिले आहेत. वेळोवेळी त्याबाबत परिपत्रकेही काढली आहेत. मात्र बहुतांश शाळा या नियमांचे उल्लंघन करूनही त्यांच्यावर शासन काहीच कारवाई करू शकलेले नाही.इंग्रजी शाळांचा भुलभुलैयाशाळेचा शैक्षणिक दर्जा कसा आहे याची कोणतीही खातरजमा न करता केवळ आपले मूल इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच शिकले पाहिजे या चुकीच्या मानसिकतेपोटी त्यांच्या शिक्षणाची हेळसांड होऊ लागली आहे.सूटबूट, टाय असा ड्रेस कोड, दप्तर, वॉटरबॅग असा देखावा करणाºया शाळांमध्ये प्रत्यक्षात शिकवायला चांगले शिक्षकच उपलब्ध नसतात. त्यामुळे दरवर्षी लाखो रूपये शिक्षणावर खर्च करून प्रत्यक्षात त्यांना चांगले शिक्षण मिळत नाही. त्यामुळे दुय्यम दर्जाच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मुलांना शिकविण्याऐवजी मराठी माध्यमाच्या सेमी इंग्रजी असलेल्या शाळांचा विचार पालकांनी करावा.फॉर्मवरच्या उत्पन्नानुसार होतो प्रवेशाचा विचारबालेवाडी येथील एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेशाच्या चौकशीसाठी पालक गेले असता, त्यांच्याकडून एक फॉर्म भरून घेतला जातो. त्यामध्ये पालकाचे उत्पन्न किती आहे हे नमूद करावे लागते.४त्याठिकाणी अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न नमूद केल्यास पालकांना प्रवेशाची पुढील माहितीच दिली जात नाही. आमच्या शाळेची वार्षिक फि एक लाख रूपये आहे, तर तुम्ही इथं कसा प्रवेश घेणार असा प्रश्न त्यांच्याकडून विचारला जातो.
पूर्वप्राथमिक प्रवेशासाठी पालकांची होतेय दमछाक, प्रवेश बंदचे लागले फलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 6:17 AM