पिंपरी : युट्युबवरील व्हिडिओ लाइक करण्यास सांगून साॅफ्टवेयर इंजिनियर महिलेला दोनशे रुपये देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर पार्ट टाइम नोकरी करू शकता, असे सांगितले. त्यात टास्क खेळण्यासाठी गुंतवणूक करण्यास सांगून साॅफ्टवेअर इंजिनियर महिलेची तीन लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली. वाकड येथे २२ ते २६ एप्रिल २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला.
याप्रकरणी २७ वर्षीय इंजिनियर महिलेने याप्रकरणी शनिवारी (दि. २९) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मोबाइलधारक व बँक अकाउंटधारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी इंजिनियर महिलेच्या माेबाइलवरून व्हाटसअप मेसेज केला. पार्टटाइम नोकरी आहे, तुम्ही घरी राहून नोकरी करू शकता, अशी खोटी बतावणी केली. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. तसेच युट्युबवरील व्हिडिओची लिंक दिली. त्याला फिर्यादी महिलेने लाइक केले. त्यासाठी आरोपींनी फिर्यादी महिलेला दोनशे रुपये दिले. त्यानंतर टास्क खेळण्यासाठी १ हजार रुपये गुंतवणूक करण्यास सांगून त्यावर ३० टक्क्यानुसार परतावा दिला. त्यानंतर आरोपींनी एका वेबसाइटची लिंक दिली. त्यावर फिर्यादी महिलेने लाॅगइन करून टास्क खेळण्यासाठी १० हजार रुपये गुंतवले. मात्र, ३० टक्क्यानुसार त्यांना परतावा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी आणखी ८० हजार रुपये गुंतवणूक केली. त्यानंतरही पैसे परत मिळाले नाही. टास्क पूर्ण करण्यासाठी आणखी पैसे गुंतवा, असे आरोपींनी सांगितले. त्यानुसार फिर्यादी महिलेने अडीच लाख रुपये आणखी गुंतवणूक केली. मात्र, त्यानंतरही त्यांची रक्कम किंवा त्यावरील ३० टक्के परतावा फिर्यादी महिलेला मिळाला नाही. विविध बँक खात्यावर तीन लाख ४० हजार रुपये ऑनलाइन घेऊन फिर्यादी महिलेची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र गिरणार तपास करत आहेत.