लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीच्या अध्यक्षपदाचा पदभार कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील, अशा अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. मात्र, मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील अनेक मार्गांवरील पीएमपी बस बंद केल्याने चांगल्या सुविधा मिळण्याऐवजी गैरसोयींचाच सामना करावा लागत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक नागरिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देत पीएमपी बसने प्रवास करतात. अपेक्षित ठिकाणी जाण्यासाठी बस उपलब्ध असल्याने इतर खासगी प्रवासी वाहनांऐवजी पीएमपीलाच पसंती दिली जाते. त्यामुळे प्रवाशांची देखील सोय होत होती. मात्र, मुंढे यांनी पदभार स्वीकारताच उत्पन्न मिळत नसल्याच्या कारणावरून अनेक मार्ग बंद केले आहेत. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरात मोठमोठी महाविद्यालये असून, या ठिकाणी जाण्यासाठी पुरेशा प्रमाणात बसव्यवस्था आवश्यक असतानाही बसच उपलब्ध करून दिल्या जात नसल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे अनेकजण बसने प्रवास करणे टाळत असल्याचे दिसून येत आहे. बस बंद केल्याने नागरिक पर्यायी वाहनांचा वापर करतात. एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी दोन वाहने बदलावी लागतात. यातून आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. निगडी, नेहरुनगर आणि भोसरी आगारातून पिंपरी-चिंचवड शहरासह लगतच्या परिसरात बस सोडल्या जातात. मात्र, उत्पन्न कमी प्रमाणात मिळत असल्याचे कारण पुढे करीत अनेक मार्गांवरील बस बंद केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
बस बंद झाल्यामुळे प्रवाशांचे हाल
By admin | Published: June 19, 2017 5:32 AM