पिंपरी : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयामध्ये सोमवारी (दि. ११) सर्व्हर डाऊन झाल्याने केसपेपर देता येत नव्हते. परिणामी उपचारासाठी बाह्यरुग्ण विभागामध्ये आलेल्या हजारो रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागला. आलेल्या रुग्णांमध्ये काही रुग्ण हे गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांना तब्बल तीन तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. त्यामुळे वायसीएम रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये ऑनलाईन केसपेपर दिला जातो. सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत बाह्यरुग्ण विभागामध्ये रुग्णांची गर्दी असते. दररोज एक हजाराहून अधिक रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचार घेण्यासाठी येतात. सोमवारी सकाळी दहा वाजता सर्व्हर डाऊन झाल्याने केसपेपर काढण्याची यंत्रणा ठप्प झाली. त्यावेळी तब्बल दोनशेहून अधिक रुग्ण रांगेमध्ये उभे होते. ही यंत्रणा ठप्प झाल्यामुळे रुग्णांची गर्दी वाढली. अर्ध्या तासाहून जास्त वेळ झाल्यानंतर काही रुग्णांचे नातेवाईक आक्रमक झाले. त्यांनी रुग्णालय परिसरामध्ये गोंधळ घालण्यास सुरूवात केली. मात्र, सुरक्षारक्षकांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना शांत केले. त्यामुळे वातावरण बिघडले नाही.
दरम्यान, वीजपुरवठा खंडीत होऊन बॅटरी बॅकअपच्या सुविधेमध्ये बिघाड झाल्याने सर्व्हर डाऊन झाला असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. मात्र, या प्रकारामुळे वायसीएम रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. शहरातील सर्वात मोठे व मध्यवर्ती रुग्णालय असल्याने या रुग्णालयामध्ये रुग्णांची मोठी गर्दी असते. तसेच जिल्ह्याभरातून रुग्ण येत असल्याने वायसीएमच्या यंत्रणेवर ताण येतो. त्यासाठी अद्यावत प्रणाली वापरणे आवश्यक आहे. मात्र, महापालिका प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
केसपेपरविना उपचार
दरम्यान, एक तासाहून अधिक वेळ झाल्यानंतर प्रशासनाने काही रुग्णांवर उपचार करण्यास सुरूवात केली. ज्यांना लस द्यायची आहे, अशा रुग्णांना त्यांचे कार्ड घेऊन लस देण्यात आली. त्यामध्ये रेबीजची लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक होती.
सकाळी सर्व्हर डाऊन झाल्याने सुमारे एक तास केसपेपर देण्याची यंत्रणा बंद होती. वीजपुरवठा सातत्याने खंडीत होत होता. त्यामुळे युपीएस बॅटरी बॅकअप खराब झाले. त्यामुळे सर्व्हर डाऊन झाले होते. मात्र तातडीने त्यामध्ये सुधारणा करून वैद्यकीय सुविधा पूर्ववत करण्यात आली.
- डॉ. अभयचंद्र दादेवार, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी.
आम्ही सकाळी आठ वाजता रुग्णालयामध्ये आलो आहे. दोन तास रांगेत थांबल्यावर केसपेपरसाठी नंबर आला. मात्र, सर्व्हर डाऊन झाल्याचे हे कर्मचारी सांगत आहेत. ज्या रुग्णांना भयंकर त्रास होत आहे, त्यांनी अशापद्धतीने कितीवेळ थांबायचे? याचा विचार रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केला पाहिजे. रुग्णालयातील यंत्रणा चांगली नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे.
- रुग्णाचे नातेवाईक.