पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वायसीएम व अन्य रुग्णालयांमध्ये उपचार घेत असताना मृत्यू झाल्यास, संबंधित रुग्णाचे संपूर्ण बिल माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.ऐनवेळी मांडलेल्या या विषयाला मान्यता दिली आहे. सभापती विलास मडिगेरी सभेच्या अध्यक्षस्थानी होते.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने वायसीएमबरोबरच शहराच्या विविध भागांत रुग्णालये चालविली जातात. या रुग्णालयांमध्ये पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांवर सामान्य दरात उपचार केले जातात. महापालिका रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या बहुतांशी रुग्णांची आर्थिक स्थिती बेताची असते. अशातच रुग्णाचा मृत्यू झाल्यास नातेवाईकांची आर्थिक स्थिती लक्षात घेता, हे बिल आवाक्याच्या बाहेर असते. अनेकदा या रुग्णाचा एकही नातवाईक शहरात नसल्याने हे बिल भरण्यास मित्रांना अथवा परिचितांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दु:ख बाजूला ठेवून बिलाच्या रकमेची तजबीज करावी लागते. ही बाब लक्षात घेऊन, मानवतेच्या दृष्टीकोनातून मृत व्यक्तीचे वैद्यकीय उपचारांचे संपूर्ण बिल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पिंपरीत उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास रुग्णाचे संपूर्ण बिल माफ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 3:21 PM