वडगाव मावळ (पुणे) : कडक उन्हामुळे मावळातील धरणांच्या पाणी साठ्यात घट झाली आहे. आंद्रा धरणात ७३ टक्के, वडीवळे ४७.०२ टक्के तर पवना धरणात ४७ टक्के पाणीसाठा आहे. पवना धरणाच्या पाण्यातून यावर्षी ९२ कोटींचा विक्रमी महसूल जमा झाला आहे.
मावळ तालुक्यात पवना, आंद्रा, वडिवळे, कासारसाई, जाधववाडी ही शेती उद्योगाला पाणीपुरवठा करणारी व नळपाणी पुरवठा योजनेंतर्गत पिण्याचे पाणीपुरवठा करणारी महत्त्वाची धरणे आहेत. पवना धरण हे सर्वात मोठे असून त्यातून पिंपरी-चिंचवड, देहूरोड, तळेगाव व मावळातील औद्योगिक वसाहती व तालुक्यातील ५० ते ६० ग्रामपंचायतींच्या पाणी योजना व शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो.
पवना धरणाचे उपविभागीय अभियंता अशोक शेटे म्हणाले, कडक उन्हामुळे पवना धरणात पाणीसाठा कमी होत आहे. तरी देखील १५ जुलैपर्यंत पाणीटंचाई भासणार नाही. धरणातून रोज ३३ दशलक्ष घनफूट पाणी सोडले जाते. धरणाच्या पाण्यातून यावर्षी ९२ कोटी रुपयांचा महसूल मिळाला असून मार्च महिना संपायला तीन दिवस बाकी आहेत. या तीन दिवसांत ९४ कोटीपर्यंत महसूल जमा होणार आहे.
वडिवळे धरणाचे शाखा अभियंता मनोहर खाडे म्हणाले, नाणे मावळातील वडिवळे धरणातून वडगाव, इंदोरी, कामशेत, टाकवे आदी गावांसह सुमारे १५ ग्रामपंचायती, टाकवे औद्योगिक वसाहत, तसेच अकराशे हेक्टर शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. धरणातून ९० क्यूसेकने कुंडलिका नदीच्या माध्यमातून ते इंद्रायणीला सोडले जाते. गेल्यावर्षी काही भागात बंधाऱ्यांची कामे सुरू असल्याने शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी विलंब झाला. यावर्षी बंधाऱ्याची कामे पूर्ण झाली असून पाणी अडविण्यास सुरुवात झाल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे.
आंद्रा धरणातून तळेगाव नगरपरिषद, तळेगाव एमआयडीसी, आळंदी नगरपरिषद यासह २२ संस्थांना पाणीपुरवठा केला जातो. सध्या ७२ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले.