लोकमत न्यूज नेटवर्कपवनानगर : मावळ तालुका आणि पिंपरी-चिंचवड शहराची वरदायिनी समजल्या जाणाऱ्या पवनेच्या खळाळत्या प्रवाहास उगमाच्या जवळच प्रदूषणाची लागण झाली आहे. पूररेषा निश्चित न केल्यामुळे नदीपात्रालगत वाढलेल्या अतिक्रमणामुळे नदीत सांडपाणी, मैला मिसळते. मोठ्या पोल्ट्रींचे प्रक्रिया केलेले सांडपाणी प्रक्रिया न करताच थेट पात्रात सोडलेले जात आहे.पवनेचे उगमस्थान मावळ तालुक्याच्या पश्चिमेकडील आणि रायगड पुणे जिल्ह्याच्या हद्दीजवळ आहे. तुंग व लोहगडच्या कुशीत आतवण आपटी गावच्या हद्दीत उंबराच्या झाडाच्या बुंध्याजवळ जे गोमुख आहे. त्यातून वाहनारा छोटासा पाण्याचा झरा हेच पवनेचे उगमस्थान आहे. स्वातंत्र्यानंतर पवनमावळच्या तुंग, तिकोणा, लोहगड या किल्ल्यांच्या पर्वत रांगांच्या कुशित पवना धरण बांधले गेले. हेच आज पवनेचे उगमस्थान म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. १९७२ पूर्वी पवनानदी उन्हाळी, पावसाळी वाहत असे. उन्हाळ्यामध्ये गोमुखातून पाणी प्रवाह वाढल्यानंतर स्थानिक लोक, धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेलेल्या आंबेगाव बाजार पेठेतील व्यापारी पवनेची मनोभावे पूजा करत असत. पूर्वी पेशव्यांचे सरदार भानू, ग्रामस्थ व व्यापारी नदी स्वच्छ ठेवण्यास झटत.१९७० नंतर १० टीएमसी क्षमतेच्या धरणातून पावसाळ्यासह हिवाळ्यात व उन्हाळ्यात पाण्याचा प्रवाह वाहू लागला. त्या वेळी पवनेला खऱ्या अर्थाने नदीचे स्वरूप प्राप्त झाले. १९७२ पासून दररोज १२०० क्युसेक्सने पाणी सोडले जाऊ लागले. तेव्हापासून पवना स्वच्छ प्रवाहाने वाहत होती. मात्र, १९९० च्या दशकानंतर वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगिकीकरण यामुळे पवना अस्वच्छतेच्या विळख्यात सापडू लागली. नदीपात्रातील मासे, कासव, बेडूक व इतर जलचर प्राण्यांच्या आस्तित्वामुळे बऱ्याच प्रमाणात येथील पवना स्वच्छ वाहते असे म्हणता येईल. पण, जल प्रदूषणामध्ये होणारी वाढ चिंतेचा विषय होत चालला आहे. धरणाच्या सोडल्या जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहानुसार वाहते़ तीचे पात्र २०० फूट रुंदीचे आहे. धरणाच्या पुढे असलेल्या काले, कोथुर्णे,येळसे, शिवली, कडधे, करुंज, भडवली, थुगाव, बऊर, सडवली, आोझर्डे, शिवणे, पिंपळखुटे, ऊर्से, बेबडओहळ, परंदवडी आदी गावांजवळून पवना वाहते. या भागात नदीला जास्त उतार असल्याने पात्रात पाणी न साचता ते वेगाने वाहत असते.
पवना नदीच्या प्रदूषणात उगमस्थानापासून झाली वाढ
By admin | Published: May 09, 2017 3:52 AM