रावेत : रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी यांनी सुरु केलेल्या पवना नदी स्वच्छतेच्या 'उगम ते संगम' या स्तुत्य उपक्रमाला महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर व सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनीही सहभाग घेतला. रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी संस्थापक अध्यक्ष प्रदीप पोपटाराव वाल्हेकर यांनी जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई-उगम ते संगम अशा सुरु केलेल्या अभियानाचा हा चौथा आठवडा आजचा ३५वा दिवस आहे. यामध्ये रोज ३५ ते ४० मजूर अभियानात काम करत असताना प्रत्येक रविवारी विविध एन. जी. ओ. व निसर्ग प्रेमी आणि लोक सहभागातून हे अभियान जोराने पुढे जात आहे. रोटरीचे सर्व सदस्य, वाल्हेकरवाडी ग्रामस्थ आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व निसर्ग प्रेमी व रानजाई प्रकल्पातील मजूर यांनी आज ही पाच ट्रक जलपर्णी नदीबाहेर काढून हे अभियान पूर्णत्वास नेले. यावेळी महापालिका आयुक्तांनी स्वत: नदी पात्रातील जलपर्णी काढली व प्रकल्पाची माहिती घेऊन प्रकल्पाचे व रोटरी क्लब आॅफ वाल्हेकर वाडी यांचे कौतुक केले. या उपक्रमास नगसेविका संगिता भोंडवे यांनीही सहभाग नोंदवला होता. तसेच भोंडवे यांनी त्यांच्या महिला बचत गटातील इतर महिलाही आम्ही या उपक्रमाता सामील करु असे आश्वासन दिले. तर एकनाथ पवार यांनीही प्रकल्पाची पाहणी करुन महापालिका सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी हमी त्यांनी दिली. प्रकल्पाबद्दल बोलताना रोटरी अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर म्हणाले, की दिवसेंदिवस लोकसहभाग वाढत असून ही अत्यंत आनंदाची बाब आहे. कारण आपली नदी आपणच स्वच्छ केली पाहिजे ही भावना लोकांमध्ये मूळ धरत आहे हे महत्त्वाचे आहे. शिवाय महापालिकेनेही आता पुढाकार घेतला आहे. त्यामुळे लवकरच पवनामाई उगम ते संगम स्वच्छ व सुंदर होईल, अशी खात्री त्यांनी यावेळी व्यक्त केली. रोटरी क्लब आॅफ वाल्हेकर वाडी यांच्या पुढाकाराने १९ नोव्हेंबरपासून पवनामाई स्वच्छता-उगम ते संगम या उपक्रमाला सुरुवात झाली. त्यानुसार चौथ्या रविवारी म्हणजे आज अखेर ७० ट्रक जलपर्णी पवना नदीपात्रातून काढण्यात आली असून रोवेत बंधारा ते चिंचवड मोरया गोसावी घाट असा एकूण ६ किमी चे नदी पात्र जलपर्णीमुक्त झाले आहे. यासाठी रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी, शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशन, मोरेश्वर भोंडवे मित्र परिवार, पीसीसीएफ, रानजाई, सुनील शेळके फाऊंडेशन अशा २२ सामाजिक संघटना, खासगी कंपन्या, महिला बचतगट यामध्ये सामील झाल्या असून आता लोकप्रतिनीधी व प्रशासनानेही सहभाग नोंदवायला सुरुवात केली आहे.
जलपर्णीमुक्त पवनामाई अभियान जोरात... पिंपरी पालिका आयुक्त श्रावण हार्डीकर सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 4:10 PM
रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी यांनी सुरु केलेल्या पवना नदी स्वच्छतेच्या 'उगम ते संगम' या स्तुत्य उपक्रमाला महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर व सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनीही सहभाग घेतला.
ठळक मुद्देजलपर्णी मुक्त पवनामाई-उगम ते संगम अशा सुरु केलेल्या अभियानाचा हा चौथा आठवडापवना नदीपात्रातून काढण्यात आली आज अखेर ७० ट्रक जलपर्णी : प्रदीप वाल्हेकर