पिंपरी : गणेशोत्सव सुरू होण्यास अवधी असल्याने अद्याप गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्याची यंत्रणा सज्ज झालेली नाही. असे असताना, काही मंडळांनी मंडप उभारणी केली आहे. परवानगीची प्रतीक्षा न करताच मंडप उभारणीची घाई कशासाठी, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
सार्वजनिक वाहतुकीस अडथळा ठरेल अशा पद्धतीने मंडप उभारू नयेत, तसेच रस्त्यांची खोदाई करून मंडप उभारण्यास महापालिकेने मनाई केली आहे. गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारणी करताना, कोणती काळजी घ्यावी याबद्दल दर वर्षी सूचना देण्यात येतात.एवढेच नव्हे, तर सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांना महापालिकेतर्फे अथवा अन्य संघटनांतर्फे घेण्यात येणाºया सजावट स्पर्धेसाठी अपात्र ठरविण्यात येते. देखावा, सजावट कितीही उत्कृष्ट असली, तरी महापालिकेने घालून दिलेल्या नियम आणि निकषांचे पालन केले नसल्यास अशा मंडळांना स्पर्धेत सहभागी होता येत नाही. परंतु, शहरामध्ये आतापासूनच नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे.वाहतुकीस होतोय अडथळागणेशोत्सव काळापुरता तात्पुरत्या स्वरूपात गणेशोत्सव मंडळे मंडप उभारणी करतात. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी दोन दिवस अगोदर मंडप उभारणी होऊ शकते. मात्र काही मंडळे जागा अडविण्यासाठी गणेशोत्सवाला महिनाभराचा कालावधी असताना, अगोदरच मंडप उभारण्याची घाई करतात. महापालिका तसेच पोलीस खाते यांच्याकडे गणेशोत्सवातील विविध कार्यक़्रमांसाठी परवानगी अर्ज द्यावे लागतात. स्पिकर परवाना, मंडप उभारणीसाठी परवाना घेणे बंधनकारक असते. असे असताना पहिल्यांदा मंडप उभारणी नंतर परवानगी अर्ज अशी परवानगीची उलट प्रक्रिया काही कार्यकर्ते करीत आहेत. शाळेच्या विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना रहदारीस अडचण होईल, अशा पद्धतीने मंडप उभारणी करू नये, अशी नागरिकांची मागणी आहे.