पिंपळे गुरव : नवी सांगवी, दापोडी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, सुदर्शननगर आदी परिसरांमध्ये पवना नदीपात्रात राडारोड्याचा भराव टाकून सपाटीकरण करून जागा बळकावण्याला वेग येत आहे. त्यामुळे नदीचे पात्र अरुंद होऊन नदीला ओढ्याचे स्वरूप येण्याची भीती निर्माण होत आहे. जमिनीला सोन्याचा भाव आल्याने नदीपात्राच्या जागेत राडारोड्याचे भराव टाकून टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. पवना नदीपात्रात राडारोडा टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. महापालिकेच्या निवडणुकीमुळे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांतून सुरु आहे. शासन व महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वतीने नदी सुधारसाठी अनेक योजना राबविल्या जातात. लाखो रुपये खर्चही केले जातात. तसेच महापालिकेच्या अधिकारयांकडून पूररेषा नियंत्रणासाठी पाहणी केली जाते. वर्षभरातून एकदाच पाहणी होते. मात्र पुन्हा या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते. आजही पवना नदीपात्रात भराव टाकून सर्रासपणे जागा बळकावून बांधकामे सुरू असल्याचे दृष्य पहावयास मिळत आहे. पावसाळ्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर नदीपात्रातील इमारती पाण्यामध्ये कोसळण्याची शक्यता टाळता येणार नाही. पवना नदीपात्रालगत हॉटेल, मोटार गॅरेज, भंगाराची दुकाने आदींचे साम्राज्य वाढले आहे. सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव भागातही महापालिकेने पाहणी करून कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. या दुर्लक्षपणामुळे प्रशासनाला नागरिकांची आणि नागरिकांना भविष्याची काळजी नसल्याचे दिसून येत आहे. नदीतील प्लॅस्टिकयुक्त वाढता कचरा, दुर्गंधीयुक्त पाणी, वाढती जलपर्णी आदीमध्ये पवनेचा श्वास कोंडला आहे. नदीपात्रातील राडारोडा टाकण्यास प्रतिबंध करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. मात्र हे सर्व कागदोपत्रीच असल्याचे दिसून येते. संबंधित बीट निरीक्षकांनी ही आपली जबाबदारी चोख बजावणे गरजेचे आहे. अन्यथा नद्यांना नाल्याचे स्वरूप आल्याशिवाय राहणार नाही. तसेच नदी की ओढा ओळखता येणार नाही. या सर्व गोष्टीवर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)
पवना नदीपात्र अरुंद
By admin | Published: January 25, 2017 1:49 AM