पिंपरी : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ‘अजित पवार जेलमध्ये जाणार’ याचा पुनरुच्चार केला आहे. त्याचा समाचार राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. ‘स्मार्ट सिटीची कामे सर्व मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच होतात. येत्या कालखंडात स्मार्ट सिटीतील गैरव्यवहाराची प्रकरणे समोर येणार असून, पवारांपूर्वी मुख्यमंत्रीच जेलमध्ये जातील, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अटल संकल्प अभियानात दानवे यांनी ‘अजित पवारांच्या दारात पोलीस उभे’ असे विधान केले होते. त्यानंतर गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ‘निवडणुकीपूर्वी पवारांना जेलमध्ये टाकणार’ असे विधान दानवे यांनी केले आहे.
त्यावर संजोग वाघेरे म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीचे नेते अजित पवार एसबीच्या चौकशीला सहकार्य करीत आहेत. परंतु, आमच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दानवे हे अजितदादा जेलमध्ये जाणार असे वारंवार म्हणत आहे. दानवे यांनी राजकीय उंची बघून बोलावे. राज्याभरातील स्मार्ट सिटीची कामे मुख्यमंत्री यांनी सांगितलेल्या लोकांनाच मिळत आहेत. समृद्धी महामार्गाचे कामही जवळच्या लोकांना दिले आहे. यामधील गैरप्रकार आगामी काळात बाहेर येणार असून, मुख्यमंत्र्यांनाच भविष्यात अटक होईल.’’बापट यांची काळजी करापालकमंत्री गिरीश बापट यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा ठपका न्यायालयाने शुक्रवारी ठेवला आहे. यातून मतदारांचा विश्वासघात झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश बापट यांचीच काळजी करावी. - संजोग वाघेरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
संसदरत्न कसा मिळतो?पार्थ पवार कोण, असा प्रश्न खासदार श्रीरंग बारणे यांनी केला होता. त्यावर वाघेरे म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीच्या उमेदवाराची भाजपासह शिवसेनेला धास्ती आहे. म्हणूनच युतीसाठी स्थानिक नेते आग्रही आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवार असो किंवा अन्य कोणताही उमेदवार असो, या मतदारसंघाचा आगामी खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचाच होणार आहे. संसदरत्न असलेल्या खासदार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांच्याबद्दल असे बोलणे चुकीचे आहे. संसदरत्न पुरस्कार कसा मिळतो, याचे संशोधन करण्याची गरज आहे.’’