- ज्ञानेश्वर भंडारे
पिंपरी : उद्योगनगरीचा कणा असलेल्या एमआयडीसीला अवैध वसुली व हप्तेगिरी जोरात सुरू आहे. नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमणे करून टपऱ्या, पत्राशेड टाकून महिन्याला १५ ते २० हजार रुपये भाडे उद्योजकांकडून वसूल केले जाते. शिवाय एमआयडीसीतील मोकळ्या जागांवर अतिक्रमण सुरू झाले आहे. अशा पद्धतीने चिंचवड व भोसरी एमआयडीसी भागात राजरोस अतिक्रमणे सुरू आहेत. मात्र, एमआयडीसीतील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने या वसुली ‘पंटर’चा धंदा जोरात सुरू आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये ८० च्या दशकात मोठमोठ्या कंपन्यांनी प्रवेश केला. त्यापाठोपाठ त्यांना लागणाऱ्या कच्च्या मालाचा, सुट्या पार्टसचा पुरवठा करणाऱ्या कंपन्याही शहरात येऊ लागल्या. मोठ्या कंपन्यांसाठी आवश्यक छोटे पार्ट व साहित्य निर्मितीसाठी पिंपरी, भोसरी व चिंचवड येथे लहान कंपन्या व छोटे कारखाने वाढत गेले. हा परिसर एमआयडीसी म्हणून राज्य शासनाच्या अखत्यारित गेला. मात्र, एमआयडीसी विभागाकडून संबंधित औद्योगिक क्षेत्राकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या भागात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत असून, त्याला खतपाणी घालण्यासाठी गावगुंडांनी हप्ते वसुली सुरू केली आहे. या हप्ते वसुलीने एमआयडीसीतील उद्योजक हैराण झाले आहेत. अन् एमआयडीसीतील अतिक्रमण व हप्तेगिरीचा त्रास दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
महिन्याकाठी लाखोंची उलाढाल....
एमआयडीसी परिसरात नैसर्गिक नाल्यावर तसेच प्लॉटवर अनधिकृत पत्राशेड जवळपास शंभरहून अधिक आहेत. प्रत्येकाने आपले आपले भाग वाटून घेतले आहेत. अनधिकृत पत्राशेडला प्रत्येकी १५-२० हजार रुपये भाडे आकारले जाते. मात्र, याची ना एमआयडीसी अधिकाऱ्यांना माहिती आहे ना महापालिकेच्या अनधिकृत विभागाला सोयरसुतक. महिन्याकाठी लाखोंच्या घरात वसुली पंटरकडून अनधिकृत हप्तेगिरी सुरू आहे.
महापालिका-एमआयडीसी वादात दुकानदारी जोरात..एमआयडीसीतील रस्त्यांवर होणाऱ्या अतिक्रमणांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात येते. मात्र, एमआयडीसीच्या अखत्यारित येणाऱ्या जागेवर एमआयडीसीने कारवाई करायची असते. यांच्या वादात या अनधिकृत वसुली पंटरची दुकानदारी जोरात सुरू आहे.एमआयडीसीतील रस्त्यांवर होणाऱ्या अनधिकृत टपऱ्या, पत्राशेडवर महापालिका कारवाई करते. मात्र, एमआयडीसीतील प्लॉटवर अनधिकृत कोणी पत्राशेड, टपऱ्या उभे करून भाड्याने देत असेल, तर त्यांच्यावर कारवाई नक्कीच करण्यात येईल.- संजय कोटवाड, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी.