पिंपरी : काॅट बेसिसवर पेईंग गेस्ट (पीजी) म्हणून राहत असलेल्या तरुणाने एलईडी टीव्ही चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच या टीव्ही ओएलएक्स या वेबसाईटवर तसेच झोपडपट्टीत विकल्याचे तपासातून उघडकीस आले आहे. या चोरट्यास हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ६२ हजारांच्या १२ एलईडी टीव्ही जप्त केल्या.
मकरंद मायाधर पृष्टी (वय २९, रा. बालेवाडी, ता. मुळशी, मूळगाव झाडता, ता. खंतापडा, जि. बालेश्वर, ओरीसा), असे आरोपीचे नाव आहे. विष्णू रामरेड्डी पालगिरी (वय २६, रा. इंपेरियल पीजी, जयरामनगर, हिंजवडी) यांनी याप्रकरणी ८ जानेवारी रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
फिर्यादी यांच्या इमारतीत भाडे तत्वावर काॅट बेसिसवर पेईंग गेस्ट राहतात. त्यात आरोपी मकरंद पृष्टी हा देखील पेईंग गेस्ट म्हणून राहत होता. तसेच तो फिर्यादी यांच्याकडे कामाला होता. दरम्यान, कोरोना महामारीमुळे फिर्यादी यांच्याकडे काॅट बेसिसवरील पेईंग गेस्ट नाहीत. त्यांच्याकडील पीजी खोल्या रिकाम्या आहेत. याचा गैरफायदा घेत आरोपीने त्या खोल्यांमधील एलईडी टीव्ही चोरून नेल्या. ६ ते १८ डिसेंबर २०२० दरम्यान चोरीचा हा प्रकार घडला. ८६ हजारांच्या १६ एलईडी टीव्ही चोरीला गेल्याबाबत फिर्यादी यांनी फिर्याद दिली.
चोरीच्या प्रकारानंतर आरोपी पृष्टी गायब झाला होता. त्यामुळे संशय बळावला. तसेच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यावरून पोलिसांनी आरोपी पृष्टी याला ताब्यात घेतले. टीव्ही चोरून त्या ओएलएक्स तसेच झोपडपट्टी भागात विक्री केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याच्याकडून ६२ हजार रुपये किमतीच्या १२ एलईडी टीव्ही जप्त केल्या.
हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण सावंत, निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड, सहायक निरीक्षक सागर काटे, उपनिरीक्षक जितेंद्र कदम, सहायक उपनिरीक्षक महेश वायबसे, पोलीस कर्मचारी बंडू मारणे, नितीन पराळे, बाळकृष्ण शिंदे, महेश नाळे, कुणाल शिंदे, अतिक शेख, हनुमंत कुंभार, चंद्रकांत गडदे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, ओम कांबळे, सुभाष गुरव, अमर राणे, दत्ता शिंदे, झनकसिंग गुमलाडू, आकाश पांढरे, रवी पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली