पिंपरी : महापालिकेत सरळसेवेने भरतीप्रक्रिया राबविण्यात आली. या परीक्षेसाठी शहरासह राज्यातून ८५ हजार ७७१ जणांनी अर्ज केले होते. त्यातून महापालिकेला ७ कोटी ८ लाख १३ हजार ६०५ रुपयांचा महसूल जमा झाला. यातून टीसीएस कंपनीला ५ कोटी ६६ लाख ३५ हजार ७१४ रुपये परीक्षा कामी खर्च करण्यात आले. तर जॅमर बसविण्यासाठी ४ लाख ३३ हजार ४२६ रुपयांचा खर्च करण्यात आला आहे, अशी माहिती उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी दिली.
सरळसेवा भरतीसाठी निवडण्यात आलेल्या कंपन्यांकडून घोटाळे होत असल्याने महापालिकेने २१ नोव्हेंबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार महापालिकेतील पदांच्या भरतीसाठी ‘टीसीएस’ कंपनीची निवड करण्यात आली. त्यासाठी टीसीएसला ५ कोटी ६६ लाख ३५ हजार ७१४ रुपये अदा करण्यात आले.
प्रतिविद्यार्थी ६६५ रुपये खर्च...
महापालिकेमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेस प्रतिविद्यार्थी ६६५ रुपये खर्च महापालिकेला आला आहे. या रकमेतून परीक्षा केंद्र, सीसीटीव्ही, प्रश्नपत्रिका, संगणक खोली आदींचा खर्च टीसीएस करणार आहे. त्यामुळे महापालिकेने टीसीएसला ६६५ रुपयांप्रमाणे देण्यात आले आहेत. तर महापालिकेने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून एक हजार तर प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून ८०० रुपये फी घेतली होती.