पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेची पत सुधारत असून, महापालिकेस अअ- प्लस आर्थिक पत नामांकन मिळाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे पत नामांकन स्थिर आहे, अशी माहिती महापालिकेने दिली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेस मिळणारे नामांकन आर्थिक विवेक आणि स्थिरतेचा दाखला आहे. महापालिकेच्या २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे आणि २०२३-२४ च्या पहिल्या सहामाहीच्या आर्थिक कामगिरीवरून मूल्यांकन झाले आहे.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, 'अअ- प्लस पत नामांकन महापालिकेच्या आर्थिक स्थिती चांगली आहे. हे दर्शवते. गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेस हाच दर्जा मिळत आहे.' मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेस पत नामांकन मिळत आहे. देशात खूप कमी महानगरपालिका आहेत
ज्यांना नामांकन मिळते. पिंपरी चिंचवड महापालिकेस मिळालेले हे नामांकन केवळ आर्थिक सामर्थ्याचा पुरावा नाही तर गुंतवणूकदार, भागधारक तसेच नागरिकांनी महापालिकेच्या आर्थिक व्यवस्थापनावर ठेवलेल्या विश्वासाचे प्रतिबिंब आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांसाठी महापालिका एक विश्वासार्ह संस्था आणि इतर स्थानिक संस्थांसाठी एक आदर्श उदाहरण बनत आहे. महापालिकेचे पत नामांकन चांगले असल्यामुळे कर्ज तसेच म्युनिसिपल बॉण्डला अधिक प्रतिसाद मिळण्यास मदत होत आहे.''