PCMC: अजित पवारांच्या मर्जीतील अधिकारी अतिरिक्त आयुक्तपदी येणार? महापलिकेत चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 12:58 PM2023-09-05T12:58:09+5:302023-09-05T12:59:04+5:30
आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांचा प्रस्ताव फेटाळला...
पिंपरी : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांना महाराष्ट्र प्रशासकीय लवाद (मॅट)ने दणका दिला आहे. त्यांची महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त पदावरील दोन वर्षांची नियुक्ती २२ सप्टेंबरपर्यंतच आहे. ते भाजप आमदारांच्या मर्जीतील मानले जातात, त्यामुळे आता त्या पदावरील नवा अधिकारी राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील असेल, असे सांगितले जात आहे.
उपायुक्त स्मिता झगडे यांची १३ सप्टेंबर २०२२ रोजी राज्य शासनाने अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली; पण, आयुक्त शेखर सिंह यांनी नऊ दिवस झगडे यांना रुजू करून घेतले नाही. भाजपचे आमदार आणि आयुक्तांनी हा प्रतिष्ठेचा विषय केला होता. त्यानंतर राज्य शासनाने २२ सप्टेंबर २०२२ रोजी झगडे यांची नियुक्ती रद्द करून प्रदीप जांभळे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली; पण झगडे यांनी जांभळे यांच्या नियुक्तीला ‘मॅट’मध्ये आव्हान दिले होते. झगडे यांनी राज्य सरकार, जांभळे आणि महापालिका आयुक्तांना प्रतिवादी केले होते. त्यावर ‘मॅट’ने निकाल दिला आहे.
आयुक्त, अतिरिक्त आयुक्त मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील
पिंपरी-चिंचवड शहर अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. आता पवार यांचा गट शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे शहरात पवारांच्या मर्जीतील अधिकारी आणले जातील. त्यातून भाजपच्या आमदारांना राष्ट्रवादीकडून शह दिला जाईल. आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे हे अधिकारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या मर्जीतील असल्याचे मानले जाते.
आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांचा प्रस्ताव फेटाळला
महापालिकेत सध्या तीन अतिरिक्त आयुक्त आहेत. त्यापैकी एक आयुक्त आयएएस दर्जाचे असावेत, असा प्रस्ताव महापालिकेने नगरविकास विभागाकडे पाठवला होता. मात्र, नगरविकास विभागाने तो प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे या पदावर अतिरिक्त आयुक्त या संवर्गातील अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार आहे.