नारायण बडगुजर
पिंपरी : महापालिकेची निवडणूक लढविण्याची अनेकांनी तयारी केली आहे. मतदारांपर्यंत पोहचण्याचा त्यांच्याकडून खटाटोप सुरू आहे. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर होत आहे. अशा इच्छुक उमेदवारांकडून रिल्स, व्हिडिओ, मेसेज, पोस्ट व्हायरल होत आहेत. त्याला कंटाळलेल्या नागरिकांकडून त्यांचे नंबर ब्लाॅक केले जात आहेत. तसेच अनफ्रेंड करून अनफाॅलो केले जात आहे.
निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून देखील उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. इच्छुक उमेदवाराची प्रतिमा, त्याचा संपर्क, आर्थिक क्षमता, मतदारांपर्यंत पोहचण्याची धडपड आदी बाबींचा त्यासाठी आढावा घेतला जात आहे. त्यामुळे इच्छुकांकडून जोरदार तयारी सुरू आहे. त्यात मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी त्यांच्याकडून विविध शक्कल लढविल्या जात आहेत. सध्या घराघरात स्मार्ट फोन आहेत. त्यामुळे या फोनच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहचण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या अशा गल्लीबोळातील भाऊ व दादांनी ऑनलाईन प्रचाराला अप्रत्यक्षपणे सुरवात केली आहे. विविध घोषणा व आकर्षक ब्रिदवाक्यांचा वापर करून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या पद्धतीने सोशल मीडियावर मेसेज व्हायरल केले जात आहेत.
अनावश्यक मेसेज, पोस्ट टाळण्यासाठी...आक्षेपार्ह मजकूर असल्यास फेसबुकच्या संबंधित अकाउंटला रिपोर्ट करावा. १० किंवा त्यापेक्षा जास्त अकाउंटवरून असा रिपोर्ट आल्यास फेसबुककडून असे संबंधित अकाउंट किंवा पेज बंद केले जाते. इन्स्ट्राग्राम, ट्विटर, व्हाटसअपला देखील रिपोर्ट करावा लागतो. व्हाटसअपमध्ये सेटिंगमध्ये रिपोर्ट हा पर्याय आहे. त्यावर संबंधित अकाउंटबाबत तक्रार करावी. तसेच संबंधित मोबाईल नंबर ब्लाॅक करता येतो. ‘डू नाॅट डिस्टर्ब’ ॲक्टिवेट करता येते.
सोशल मीडियावरील अनावश्यक व्हिडिओ, फोटो डाऊनलोड करू नये. ॲटो डाऊनलोड असल्यास सेटिंग बदलून ते बंद करावे. पोस्ट आणि व्हिडिओचा भडीमार करणाऱ्या व्यक्तीचा नंबर ब्लाॅक करावा. त्यामुळे संबंधित नंबरवरून येणारे मेसेज, फोटो, व्हिडिओ येणे बंद होते.- संभाजी जाधव, सहायक पोलीस निरीक्षक, वाकड