पिंपरी : महापालिकेची निवडणूकीची आरक्षण सोडत येत्या ३१ मे रोजी होणार आहे. तीन सदस्यीय पद्धतीनुसार होणार आहे. प्रभागांनुसार लोकसंख्येचा आलेख निवडणूक विभागाने प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार अनुसुचित जाती, आणि अनुसुचित जमातींचे आरक्षण लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार निश्चित झाले आहे. आता फक्त महिला पुरूषांचे आरक्षण काढण्यात येणार आहे. लोकसंख्या सूत्रानुसार पिंपळे गुरवला अनुसूचित जमातींचे दोन वॉर्ड राखीव झाले आहेत. तर अनेक प्रभागांत एससी आणि एसटीचे आरक्षण आले आहे. तर पिंपळेगुरवमधील दोन प्रभागात खुल्या वर्गातील इच्छुकांची गोची होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत. ओबीसीशिवाय महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाने प्रभागांचे प्रारूप अंतिम केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जातींसाठी १६ टक्के आरक्षण आहे. त्यामुळे १३९ सदस्यांच्या महापालिका सभागृहात २२ सदस्य असतील. त्यात महिला व पुरुष सदस्यांची संख्या प्रत्येकी ११ असेल, तर अनुसूचित जमातीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तीन टक्के आरक्षण आहे. त्यानुसार सद्य:स्थितीत अनुसूचित जमातीतील सदस्य संख्या तीनच राहणार आहे. नवीन रचनेत ४६ प्रभाग राहणार आहेत. ११४ जागा सर्वसाधारण गटासाठी असतील.विद्यमान नगरसेवकांची गोचीलोकसंख्येच्या सूत्रानुसार प्रभाग क्रमांक ४४ पिंपळेगुरव, राजीव गांधीनगर या दोन प्रभागांत एससी आणि एसटीसाठी राखीव राहतील. त्यानुसार महापालिका प्रभाग क्रमांक ६ दिघी बोपखेल आणि पिंपळेगुरव, राजीव गांधीनगर मध्ये एसटीचे आरक्षण असणार आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांचे प्राबल्य असणाºया पिंपळेगुरवमधील दोन्ही प्रभागात एससी आणि एसटीचे आरक्षण आले आहे.
खुल्या प्रवर्गासाठी दोनही प्रभागात एकच जागा राहत आहे. या प्रभागांमध्ये भाजपाचे विद्यमान नगरसेवक आहेत. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यमान नगरसेवकांची गोची होणार आहे. विद्यमान नगरसेवक एकमेकांसमोर ठाकणार आहेत.प्रारूप प्रसिद्ध होणारआरक्षण सोडत मंगळवारी होणार असून त्यात अनुसुचित जाती-जमाती, खुल्या प्रवर्गातील महिला आणि पुरूषांचे आरक्षण काढण्यात येणार आहे. तसेच बुधवारी प्रभाग निहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जात आहे. १ जूनला प्रभाग निहाय सूचना आणि हरकतींसाठी कालावधी असणार आहे. तर हरकती आणि सूचनांसाठी ६ जूनपर्यंत मुदत असणार आहे. तर १३ जूनला अंतिम आरक्षण प्रसिद्ध केले जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी दिली.