पिंपरी : आगीच्या घटना टाळण्यासह तत्काळ मदतीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन दल सज्ज झाला आहे. शहरात फायर फायटर बाइकद्वारे गस्त घालण्यात येणार आहे. खासकरून वसाहत व छोट्या गल्लीबोळांत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी या बाइकचा वापर होणार आहे.
दिवाळी तोंडावर आली असून, या काळात मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. यामुळे आगीच्या घटना घडण्याची शक्यता असते. एखादी दुर्घटना घडल्यास मोठे नुकसान होते. काही प्रसंगी जीवितहानीही होते. अशा घटना टाळण्यासाठी अग्निशमन दल सज्ज झाले आहे. दिवाळीदरम्यान, सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा आणि सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत, तसेच शहरातील आठ केंद्रांवरील सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
गर्दी, वर्दळीच्या ठिकाणी यंत्रणा तैनात
गर्दी आणि वर्दळीचे ठिकाण असलेल्या पिंपरी कॅम्प, चिखलीतील कुदळवाडी येथे अतिरिक्त यंत्रणा तैनात केली जाणार आहे, तसेच फायर फायटर मोटार बाइकद्वारे ठिकठिकाणी गस्त सुरू राहणार आहे. यामुळे आगीच्या घटना रोखण्यासह तत्काळ मदत मिळू शकेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
असा आहे फायदा
- या बाइक्सवर दोन्ही बाजूला पाण्याच्या छोट्या टाक्या असतील. एकूण ४० लिटर पाणी नेता येईल.
- याशिवाय इनबिल्ट इंजिनमुळे घटनास्थळी असणाऱ्या पाण्याच्या टाक्यांमधून पाणी खेचून फवारा करता येणार आहे.
- गाडीवरच पाण्याची सोय असल्यामुळे अडगळीच्या ठिकाणी पाठीवरून पंप नेण्याची गरज भासणार नाही.
- अग्निशमन दलाचे दोन जवान या बाइकवरून जाऊ शकणार आहेत.
- बाइकवर सायरन, वायरलेस संपर्क यंत्रणा आणि मिनिटाला ८ लिटर पाण्याचा फवारा करू शकणारी यंत्रणा राहील.
अशी आहे यंत्रणा
अग्निशमन केंद्र : ०८
एकूण वाहने : २०
कर्मचारी : १२०
फायर फाइटर बाइक : ०६
फायर फायटर बाइक या छोट्या गल्लीबोळ व गर्दीच्या ठिकाणी कामाला येणार आहेत. सध्या दिवाळीच्या सुट्यांमुळे अधिकारी, कर्मचारी सर्व स्थितीवर लक्ष ठेवून असतील, कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या आहेत. सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. वेळोवेळी आढावा घेतला जात आहे.
-किरण गावडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, महापालिका