पिंपरी : ‘महापालिका सेवेत रुजू झालो, त्यावेळी आनंद होता. मात्र, इथे विभागात नीटपणापने ट्रेनिंग दिले जात नाही. वरिष्ठांकडून अत्यंत अपमानास्पद वागणूक मिळते. त्यामुळे महापालिका सेवेपेक्षा प्रशासनातील सेवा केलेली कधीही चांगली...’ दिवसरात्र अभ्यास करून परीक्षा देऊन अपमान करून घेणे रुचत नसल्याचे सांगत महापालिका सेवेत नव्याने रुजू झालेले कर्मचारी राजीनामे देत आहेत. त्यांच्या जागी प्रतीक्षायादीतील उमेदवारांची निवड करण्यात येणार असल्याची महापालिका प्रशासनाने माहिती दिली.
महापालिकेच्या वतीने गेल्यावर्षी नोकर भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. विविध ११ पदांच्या ३६२ जागांसाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. त्यात सर्वाधिक २१३ जागा लिपिक पदासाठी होत्या. आरक्षणानुसार निवड झालेल्या उमेदवारांना महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने पत्रव्यवहार करून बोलावून घेतले. निवड झालेल्यांना नियुक्तिपत्रही देण्यात आले; मात्र त्यातीन ९ जणांनी चारित्र्य वर्तणूक पडताळणी आणि शारीरिक पात्रता तपसाणी करून घेतली नाही. तसे, महापालिकेस कळविले नाही. त्या उमेदवारांना नोकरीची आवश्यकता नाही, असे समजून त्यांची निवड रद्द करण्याचा निर्णय आयुक्त शेखर सिंह यांनी घेतला आहे. त्यांच्या जागी प्रतीक्षायादीतील उमेदवारांची लिपिक म्हणून निवड करण्यात येणार आहे. दरम्यान, यापूर्वी ३ लिपिक, १ कनिष्ठ अभियंता, ८ स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदावर रुजू झालेल्या १२ कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला होता. तो आयुक्त सिंह यांनी मंजूर केला. त्यांच्या जागीही प्रतीक्षायादीतील उमेदवारांना संधी देण्यात येत आहे.
इतर ठिकाणी चांगली संधी
राज्य शासनाच्या इतर विभागांत चांगल्या पदावर संधी मिळाल्याने महापालिकेची लिपिक पदाची नोकरी नाकारली आहे. त्याबाबत त्यांच्याशी दोन वेळा पत्रव्यवहार करून आवश्यक मुदत देण्यात आली आहे. त्यांचा कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना नोकरीची आवश्यकता नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रतीक्षायादीतील इतर उमेदवारांना संधी देण्यात येत आहे.
- विठ्ठल जोशी, उपायुक्त, महापालिका