पिंपरी :मेट्रोच्या सुपरवायझरने ट्रकचालकासोबत २० लाखांचे लोखंड चोरले. याप्रकरणी दोघांना अटक केली. निगडी येथील भक्तीशक्ती बसडेपो ते आकुर्डी येथील खंडोबा माळ चौकादरम्यानच्या मेट्रोमार्गावर १० सप्टेंबर २०२४ ते २५ जानेवारी २०२५ या कालावधीत ही घटना घडली.सुपरवायझर हरिश्चंद्र सुनील कुमार (रा. निगडी), ट्रक चालक महंमद अनिब पटेल (रा. मोशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. महाव्यवस्थापक रवी रेडियार (तळवडे) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. २७) निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी ते निगडी या दरम्यान मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. या कामावरील साहित्यावर लक्ष ठेवण्यासाठी मेट्रोने रवी यांची अनंत स्कायइन्फ्राटेक ही एजन्सी नेमली आहे. या एजन्सीकडून हरिश्चंद्र याला सुपरवायझर म्हणून नेमण्यात आले होते. हरिश्चंद्र याने ट्रक चालक महंमद याच्यासोबत मिळून भक्तीशक्ती चौक ते खंडोबा माळ चौक या दरम्यानच्या मेट्रो साईटवरून २० लाख रुपये किमतीचे ४० टन लोखंड चोरले. मेट्रोच्या पाहणीमध्ये हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर याबाबत गुन्हा दाखल केला.