पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीचा धडाका सुरू केला आहे. आतापर्यंत ३४६ मालमत्ता सील, ५३८ मालमत्तांवर जप्ती अधिपत्र डकविले, १२८ मालमत्ता धारकांचे नळजोड खंडित अशा १ हजार १२ मालमत्ता धारकांवर थेट कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे थकबाकीदार मालमत्ता धारकांचे धाबे दणाणले आहेत. उर्वरित दीड महिन्यात जप्ती मोहीम अधिक तीव्र करण्याचा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.
उर्वरित दिवसात मालमत्ता सिल करणे, जप्त करणे आणि नळ कनेक्शन बंद करणे याचे दैनंदिन उद्दिष्ट किमान ५०० आहे. या गतीने पन्नास हजारावरील थकीत रकमा असलेल्या सर्व मालमत्ता ३१ मार्चपर्यंत जप्त किंवा सिल होणार आहेत. याचा थकबाकीदार यांनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. विशेषतः आर्थिक स्थिती असूनही ८ वर्षे कर न भरलेल्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. पालिकेच्या विकासाचे दृष्टीने ही हानिकारक बाब आहे
पिंपरी चिंचवड शहरात ६ लाख १५ हजार निवासी, बिगर निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आदी नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडून कर वसुलीसाठी महापालिकेचे १७ झोन आहेत. तसेच ऑनलाईन आणि विविध ॲपच्या माध्यमातून कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत ४ लाख ३१ हजार मालमत्ता धारकांनी तब्बल ७४६ कोटींचा कर महापालिका तिजोरीत जमा केला आहे.
'हायटेक दवंडी'चा खुबीने वापर
२१ व्या शतकात तंत्रज्ञान विकसित होत असतानाही महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने 'हायटेक दवंडी'चा अत्यंत खुबीने वापर करण्यात येत आहे. ज्या गृहनिर्माण संस्थांमध्ये कर थकीत आहे अशा सदनिका धारकांकडे किती थकबाकी आहे, सदनिका जप्तीची कारवाई केल्याची माईकव्दारे जाहीर घोषणा केली जात आहे. तसेच इतर थकबाकीदारांनी त्वरित कर भरावा असे आवाहनही करण्यात येत आहे. विशेष म्हणजे थकीत कर भरल्यानंतर संबंधित थकबाकीदाराचे माईकव्दारे जाहीर आभार मानले जात आहे.