पिंपरी : महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने तब्बल ४४७ कोटी रुपयांचा कर वसूल केला आहे. ९० दिवसांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त करदात्यांनी कर भरला आहे. शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमिनी अशा ६ लाख २ हजार २०३ नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडून महापालिका कर संकलन व कर आकारणी विभाग कर वसूल करत आहे.
महापालिकेने यंदा मालमत्ता करांची बिले वाटप महिला बचत गटांतील महिलांना देण्याचे ठरवले. याला प्रकल्प सिद्धी असे नाव देण्यात आले. जवळपास चारशे महिलांनी निव्वळ चाळीस दिवसात शंभर टक्के बिलाचे वाटप केले. यंदा नागरिकांना वेळेत बिले मिळाल्यामुळे नागरिकांनी ३० जूनपर्यंत असलेल्या सवलतींचा फायदा घेतला आहे.
३० जूनला जास्त कराचा भरणा
नेहमी वर्षाअखेर ३१ मार्च रोजी सर्वाधिक कराचा भरणा होत असतो. यंदा मात्र ३० जूनला सर्वच कर संकलन विभागीय कार्यालयात मालमत्ता धारकांची गर्दी होती. ३० जून या एकाच दिवसात तब्बल १४ हजार ६२० नागरिकांनी तब्बल ३० कोटी ८५ लाख रुपयांचा भरणा केला. त्यात २१ कोटी निव्वळ ऑनलाईन भरणा आहे. ३ लाख ३ हजार ३५० मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे. यामध्ये तब्बल २ लाख ६८ हजार ०६ निवासी मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे. त्यानंतर २३ हजार ९१६ बिगर निवासी, ७ हजार १३० मिश्र, २ हजार २४६ औद्योगिक तर २ हजार १८ मोकळ्या जमिनी असणाऱ्या मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे.
असा आला रुपया
ऑनलाईन - २९१ कोटी ८१ लाख
विविध ॲप - ४ कोटी ६८ लाख
रोख - ५२ कोटी ४७ लाख
धनादेशाद्वारे - ३७ कोटी ७४ लाख
इडीसी- ४ कोटी ८ लाख
आरटीजीएस -२१ कोटी ७० लाख
डीडी- १ कोटी ३६ लाख
कर संकलन विभागाच्या या ऐतिहासिक कामगिरीचे सर्व श्रेय जबाबदार, प्रामाणिक आणि जागरुक करदात्या नागरिकांना आहे. हा सर्व कररुपी पैसा शहराच्या शाश्वत विकासाचा पाया आहे. या शहराच्या पायाभूत सुविधा जागतिक दर्जाच्या होतील यावर मी वैयक्तिक लक्ष देत आहे.
- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका