पिंपरी : प्रशासकीय राजवटीत महापालिकेत केवळ अधिकारी आणि कर्मचारी यांची चलती आहे. चिंचवड येथे उभारल्या जाणाऱ्या सिटी सेंटरच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे प्रमुख आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ परदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे सोमवारपासून महापालिका वाऱ्यावर आहे. प्रभारी आयुक्त अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील तपासणी दौऱ्यावर आहेत. त्यामुळे कर्मचारी वर्ग अळमटळम करताना दिसून आले.
महापालिकेच्या वतीने चिंचवड स्टेशन येथील डी मार्टजवळील १ लाख ३७ हजार ३९.४६ चौरस मीटर इतकी जागा पिंपरी-चिंचवड सिटी सेंटरसाठी आरक्षित केली आहे. पीपीपीतत्वावर सिटी सेंटर बांधण्याचे नियोजन आहे. त्यासाठी सल्लागार नियुक्तीसाठी तीन वेळा निविदा प्रसिद्ध केल्या. तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी सल्लागार एजन्सीची नियुक्ती केली आहे. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया आराखडा तयार करण्याचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी दुबईवारीची टूम काढली आहे.
दुबईवारीसाठी आयुक्त शेखर सिंह यांच्यासह शहर अभियंता मकरंद निकम, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी दुबईला गेले आहेत. ते येत्या रविवारी परतणार आहेत. प्रशासनातील वाघ-सिंह दौऱ्यावर गेल्याने महापालिका वाऱ्यावर आहे. आठवड्याचा पहिला दिवस सोमवारी दुपारनंतर अधिकारी महापालिका भवनात दिसून आले. तर मंगळवारी तळमजला, पहिला, दुसरा, आणि चौथ्या मजल्यावरील विभागप्रमुख सायंकाळी तीन ते सहा वेळेत जागेवर असल्याचे दिसून आले नाही. प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील मंगळवारी मॅटमधील सुनावणीसाठी मुंबईला गेले होते. बहुतांश उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभागप्रमुखांनी दुपारूनच दांडी मारल्याचे दिसून आले. काही अधिकारी सकाळपासूनच गैरहजर होते. तर, काही अधिकारी साईट व्हिजिटच्या नावाखाली बाहेर गेले होते. त्यामुळे महापालिका वाऱ्यावर सोडल्याचे चित्र दिसले.
वादाची आज सुनावणी
आयुक्तांच्या अनुपस्थितीत अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांच्याकडे आयुक्तपदाचा प्रभारी पदभार दिली आहे. जांभळे यांच्या नियुक्तीला पालिकेच्या उपायुक्त स्मिता झगडे यांनी मॅटमध्ये आव्हान दिले आहे. त्यांच्या सुनावण्या सुरू आहेत. आज पुन्हा सुनावणी होती. अतिरिक्त आयुक्त हे सुनावणीसाठी मुंबईला गेले होते. तीनही वरिष्ठ अधिकारी नसल्याचा अधिकाऱ्यांनी फायदा घेतला. मंगळवारी दुपारनंतर महापालिका भवन तसेच आठही प्रभाग कार्यालयांत वरिष्ठ अधिकारी गायब होते. तसेच विभागप्रमुखांनी दांडी मारली. त्यामुळे कर्मचारी अळम-टळम करताना दिसून आले.