पिंपरी-चिंचवड (रहाटणी) : भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटना व भीम सैनिकांनी तसेच राहुल मित्र मंडळ व सारनाथ बुद्ध विहार व परिसरातील अनेक कार्यकर्ते एकत्रित येत राहाटणी, पिंपळे सौदागर परिसरात काढलेला निषेध मोर्चा शांततेत पार पडला, त्यास स्थानिक व्यापाऱ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरात अगदी सकाळ पासूनच सर्वत्र व्यापाऱ्यांनी बंद पाळल्याने परिसरात सर्वत्र शुकशुकाट होता. सकाळी रहाटणी चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. पोलीस बंदोबस्तात कोकणे चौक, शिवार चौक, कुणाल आयकॉन रस्ता, गोविंद यशदा चौक, गंगा पार्क चौक, पिंपळे सौदागर गावठाण पुन्हा रहाटणी चौकातील सारनाथ बुद्ध विहाराजवळ निषेध मोर्चाची सांगता करण्यात आली.मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेतली जात होती. या परिसरातील व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन करताच त्याला प्रतिसाद देत काही व्यापाऱ्यांनी निषेध मोर्चात सहभाग घेतला. या वेळी वाकड पोलीस व सांगवी पोलीस तैनात होते. रहाटणी व पिंपळे सौदागर परिसर हा नेहमी गजबजलेला असतो. या परिसरात शहराच्या तुलनेने बँका, मॉल, हॉटेल, एटीएम सर्वात जास्त आहेत. मात्र सकाळपासूनच रस्ते निर्मनुष्य दिसून येत होते. अगदी रस्त्यावर उभे असणाऱ्या नागरिकही भीमा कोरेगाव घटनेच्या विरोधात घोषणा देत होते. या मोर्चाचे नेतृत्व अरुण चाबुकस्वार, मोहन भालेराव, विशाल भालेराव, बी. एस. कांबळे, राजू भालेराव, दीपक भालेराव, शांताराम भालेराव यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.
रहाटणी, पिंपळे सौदागरमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, शांततेत निषेध मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 3:42 PM
विविध सामाजिक संघटना व भीम सैनिकांनी तसेच राहुल मित्र मंडळ व सारनाथ बुद्ध विहार व परिसरातील अनेक कार्यकर्ते एकत्रित येत राहाटणी, पिंपळे सौदागर परिसरात काढलेला निषेध मोर्चा शांततेत पार पडला.
ठळक मुद्देव्यापाऱ्यांनी बंद पाळल्याने परिसरात सर्वत्र शुकशुकाटमोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी