पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील पवना, मुळा आणि इंद्रायणी प्रदूषणाबाबत ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर आमदार उमा खापरे यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडली. त्यानंतर मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत ग्रामीण भागात प्रदूषण रोखण्यासाठी गावांना निधी द्यावा, एमआयडीसीनेही उपाययोजना कराव्यात, अशा सूचना दिल्या. सांडपाण्यावर प्रक्रिया न करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना दंड करा, नदी प्रदूषण रोखण्यासाठी राज्य शासन निधी देण्याबाबत सकारात्मक आहे. मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बैठकीत सांगितले.
पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्या उगमस्थानापासून संगमापर्यंत प्रदूषित होत असल्याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठविला. त्यानंतर आमदार खापरे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी मांडली. त्यावेळी केसरकर यांनी उत्तर दिले होते. त्यानंतर म्हाळुंगे येथे बैठक झाली. आयुक्त शेखर सिंह, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसचिव डॉ. अविनाश ढाकणे, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार उपस्थित होते.
इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या आराखड्याचे सादरीकरण केले. नदीच्या हद्दीतील सर्व नाल्यांचे सांडपाणी इंटरसेप्टर लाइनद्वारे नजीकच्या मैला शुद्धीकरण केंद्रामध्ये प्रक्रिया करण्यासाठी संकलित होते, असे शेखर सिंह यांनी सांगितले.
नगरपरिषदा, ग्रामपंचायतींनी एकत्रित काम करावे
मुख्य अभियंता अशोक भालकर यांनी इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत अहवालाचे सादरीकरण केले. प्रदूषण कमी करण्यासाठी उगमापासून कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यावर केसरकर यांनी सर्व नगरपंचायती, नगरपरिषदा व ग्रामपंचायतींनी एकत्रित काम करण्याबाबत सूचना दिल्या.
मोठ्या गृहनिर्माण संस्थांवर कारवाई करा
केसरकर म्हणाले, दूषित पाणी नदीत जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे नवे प्रकल्प उभारताना जुने प्रकल्पही सुरूच राहतील याकडे लक्ष द्यावे. नद्यांमधील प्रदूषण रोखण्यासाठी मोठ्या गृहनिर्माण संस्थांचे सांडपाणी एकत्र करून त्यावर प्रक्रिया करण्याचा प्रयत्न करावा. प्रक्रिया होत नसल्याचे आढळल्यास दंडात्मक कारवाई करावी.
समन्वयाने उपाययोजना करा
उमा खापरे म्हणाल्या, पवना, मुळा आणि इंद्रायणी नदी प्रदूषित होत असल्याबाबत अधिवेशनात आवाज उठवला होता. पुरावेही दिले होते. त्याची दखल घेतली. विविध विभागांनी समन्वयाने उपाययोजना करून नदीत जाणारे दूषित पाणी रोखण्याचे उपाय योजावेत.