पिंपरी : शहरातील सार्वजनिक स्वच्छता गृह, नालेसफाई, प्लास्टिक बंदी, या प्रलंबित कामांचा आढावा पालिकेच्या आरोग्याच्या विभागाकडून घेण्यात आला. तसेच नालेसफाईत हलगजीपणा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे पालिका प्रशासनाने असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिकेतील आरोग्याच्या प्रश्नाबाबत महापालिकेत बैठक झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहायक आयुक्त मनोज लोणकर, आरोग्य निरीक्षक, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विविध कामांचा आढावा घेण्यात आला. शहरातील दैनंदिनपणे उचलला जाणारा ओला आणि सुका कचरा वर्गीकरण, शौचालये, स्वच्छतागृहांचे बांधकाम, अनुदान वाटप, दैनंदिन स्वच्छता, मलनिस्सारण व्यवस्था, नालेसफाई, पावसाळी कामे आणि प्लास्टिक बंदीचा आढावा घेण्यात आला. अतिरक्त आयुक्त गावडे म्हणाले, हागणदारी मुक्त शहर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहरातील विविध भागातील झोपडपट्टी परिसरात वैयक्तिक स्वच्छतागृहे निर्माण करण्याचे काम सुरू आहे. त्यापैकी दहा हजार पाचशे लाभार्थींना स्वच्छतागृहे बांधून दिली आहेत. तसेच दीड हजार स्वच्छतागृहे तयार करण्याचे काम सुरू आहे.
कुचराई केल्यास कारवाई महापालिकेच्या वतीने नालेसफाई आणि स्वच्छता याबाबत धडक मोहीम हाती घेतली आहे. याबाबत गावडे म्हणाले,नालेसफाई आणि स्वच्छतेच्या कामाची पाहणी करण्यात येणार आहे. अचानकपणे ही पाहणी करण्यात येणार आहेत. कामात कुचराई करणारे आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. या मोहिमेत क प्रभागातील तिघांना दंडही केला आहे. त्यात वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. त्यामुळे नालेसफाई आणि स्वच्छतेची कामे कर्मचाऱ्यांनी वेळेत कामे करावीत. नालेसफाई पावसाळ्यापूर्वी पूर्ण केली जाणार आहे.
प्लास्टिक बंदी कारवाई सुरू राज्य शासनाने प्लॉस्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतर महापालिका परिसरात कारवाई सुरू केली आहे. दंडात्मक कारवाई सुरू आहे. पाच हजार रुपये दंडही आकारण्यात येत आहे. तसेच प्लास्टिक वापरू नये, याबाबत सामाजिक प्रबोधनही केले जात आहे. प्लास्टिक विषयी जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर कडक कारवाई करण्यात येईल, असे गावडे म्हणाले.