पिंपरी : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा आणि नवनिर्वाचित अध्यक्ष एन. चंद्र्रशेखरन यांनी सोमवारी टाटा मोटर्सच्या पिंपरी प्रकल्पातील कामगारांची भेट घेऊन संवाद साधला. कामगारांचे प्रश्न थेट जाणून घेतले. यासह प्रलंबित वेतनकरार लवकरात लवकर मार्गी लावू, असे आश्वासन रतन टाटा व चंद्रशेखरन यांनी दिले. यानंतर चार दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन कामगारांनी स्थगित केले. प्रलंबित वेतनकराराचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, या मागणीसाठी टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनच्या वतीने कंपनीच्या आवारातच गेल्या चार दिवसांपासून आंदोलन सुरू होते. दरम्यान, टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोमवारी प्रथमच पिंपरी प्रकल्पाला भेट दिली. त्यांच्या समवेत नवनिर्वाचित अध्यक्ष एन. चंद्रशेखरनदेखील उपस्थित होते. तीन वर्षांत लोप पावत असलेली टाटा संस्कृती अधिक वृद्धिंगत व्हावी. कामगार आणि व्यवस्थापनामध्ये सौहार्दाचे वातावरण तयार व्हावे, या मुद्द्यावर त्यांनी कामगारांशी चर्चा केली. या वेळी रखडलेला वेतनकरार लवकरात लवकर पूर्ण करावा, अशी मागणी युनियनने केली.(प्रतिनिधी)
प्रलंबित वेतनकरार लागणार मार्गी
By admin | Published: March 21, 2017 5:21 AM