पिंपरी : ‘‘भोसरी हे पहिलवानांचे गाव आहे असे ऐकून होतो; मात्र हा अंदाज पूर्णपणे चुकीचा ठरला. कारण येथील सगळीच माणसे रसिक आहेत. ग. दि. माडगूळकरांनी अजरामर करून ठेवलेल्या कविता या जीवनामध्ये ऊर्मी देण्याचे काम करतात,’’ असे मत रमेश देव यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद, भोसरी व लायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने २५वा राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सव पार पडला. भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात रसिक प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हा कार्यक्रम पार पडला, या वेळी देव बोलत होते.
ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दीदिनी दर वर्षी हा महोत्सव घेतला जातो. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना गदिमा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, प्रांतपाल ३२३४डी२ चे एमजेएफ रमेश शहा, गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर , महाराष्ट्र साहित्य परिषद, भोसरीचे अध्यक्ष मुरलीधर साठे, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. काव्यभूषण नारायण पुरी यांना गदिमा काव्यप्रतिभा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संजय चौधरी यांची कविताच माझी कबर, पी. विठ्ठल यांची शून्य एक मी, डॉ. अनुज जोशी यांची उन्हाचे घुमट खांद्यावर या काव्यरचनांसाठी गदिमा साहित्य पुरस्कार देण्यात आला. महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, ग. दि. माडगूळकर हे मॅट्रिकपर्यंतही शिकले नाहीत, पण त्यांनी गीत रामायणासारखी अजरामर कलाकृती तयार करून ठेवली. राजा परांजपे, सुधीर फडके यांची त्यांना मिळालेली साथ मोलाची ठरली. या त्रिकुटाने दिलेले योगदान महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही. महापौर राहुल जाधव यांनी भव्यदिव्य अशा नवीन नाट्यगृहाला गदिमा असे नाव देण्याचे आश्वासन दिले. भरत दौंडकर, संदीप कानडे यांनी सूत्रसंचालन केले.पुरस्कारार्थी : ‘झुंड’ कादंबरीला मृत्युंजय पुरस्कारचित्रपटसृष्टीतील यशस्वी संसारी दांपत्य रमेश देव व सीमा देव यांना गदिमा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना गदिमा चित्रमहर्षी, लोककलेच्या उपासक रेखा मुसळे यांना लोककला पुरस्कार, सूत्रसंवादक व निवेदक सुधीर गाडगीळ यांना शब्दयात्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे संजय कळमकर यांनी लिहिलेल्या झुंड या कादंबरीसाठी मृत्युंजय साहित्य पुरस्कार त्यांना देण्यात आला. व्यवसायामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या श्रीकांत नेऊरगावकर व संदीप कुदळे यांना महाराष्ट्र उद्योगभूषण पुरस्कार देण्यात आला.