पिंपरी : पेट्रोलचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडल्याने पेट्रोलवरील दुचाकी वापरणे परवडत नाही. त्यामुळे खर्चात बचतीसाठी अनेक जण इलेक्ट्रिक स्कूटर अर्थात ई-बाइक खरेदी करत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत इलेक्ट्रिक बाइकने अचानक पेट घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे विजेवर चालणाऱ्या गाड्यांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे सरकार या प्रकारच्या वाहनांच्या खरेदीसाठी प्रोत्साहन देत असताना असे प्रकार घडल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
इंटरनल कंब्शन इंजिन वाहनांमध्ये आग लागण्याचा अधिक धोका असतो. या वाहनांमध्ये असलेली लिथियम आयन बॅटरीमुळे अधिक भीषण आग लागू शकते. तसेच इलेक्ट्रिक वाहनांमध्ये लागलेली आग विझवणे अधिक कठीण असल्याचे एक्स्पर्टचे म्हणणे आहे. त्यामुळे तुम्हीही इलेक्ट्रिक स्कूटर वापरत असाल, अथवा विकत घेणार असाल. तर इलेक्ट्रिक स्कूटर वापरताना योग्य ती काळजी घ्या आणि तुमच्या बाइकची वेळोवेळी निगा राखा.
गाड्यांना आग लागण्याचे कारण काय?
- लिथियम-आयन बॅटऱ्या ज्वलनशील असतात.- विजेवर चालणाऱ्या गाड्यांना आग लागण्याची अनेक कारणे असू शकतात.- उत्पादनातील दोष, बाह्य भागाला तडा जाणे, किंवा बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम वाहनात योग्य प्रकारे बसवली न गेल्यास आगी लागण्याच्या घटना घडतात.- तापमानातील चढ-उतार हेही आगीचे एक कारण सांगितले जाते.- उष्ण तापमानात बॅटऱ्यांचे तापमान ९० ते १०० अंश सेल्सिअसपर्यंत वाढून त्या पेट घेऊ शकतात.
आगीच्या घटनांमुळे ग्राहकांमध्ये काहीसं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय
स्कूटरच्या निर्मितीवेळी काही कमी राहिल्यास, एक्स्टर्नल डॅमेज अथवा खराब सॉफ्टवेअर हेदेखील आगीचे कारण असू शकते. खराब झालेल्या अथवा डॅमेज सेलमध्ये अधिक हीट निर्माण होते. यात एका सेलमध्ये निर्माण झालेली हीट दुसऱ्या सेलमध्ये पोहोचते, यामुळे चेन रिॲक्शन होऊनदेखील आग लागू शकते. इलेक्ट्रिक स्कूटरला लागणाऱ्या आगीच्या घटनांमुळे ग्राहकांमध्ये काहीसं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. मात्र आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची आणि बॅटरीची योग्य निगा राखली, वेळोवेळी तपासणी केली, सर्व्हिसिंगची कामं केली, तर अशा घटना टाळता येतात. - किरण गावडे, मुख्य अधिकारी, अग्निशामक विभाग, महापालिका.