देहूरोड : पिंपरी-चिंचवड महापालिका व पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता बुधवारपासून लागू झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे जिल्हा परिषद व पीएमपीतील लोकप्रतिनिधींची छायचित्रे संबंधित संकेतस्थळावर अद्यापही झळकत आहेत. त्यामुळे संबंधित संस्थांकडून आचारसंहितेचा भंग होत नाही का, जिल्हा निवडणूक अधिकारी दखल घेतील का, असा सवाल जागरूक नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता ११ जानेवारीला लागू झाली आहे. सर्वांवर आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याची कायदेशीर जबाबदारी आहे. असे असताना जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर ‘मान्यवर’ शीर्षकावर क्लिक केले असता, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय ग्रामविकास मंत्री वीरेंद्रसिंह चौधरी, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, तसेच विविध सभापतींची छायाचित्रे झळकत आहेत. पदाधिकारी व सदस्य या शीर्षकाखाली सर्व ७५ जिल्हा परिषद सदस्यांची आणि जिल्ह्यातील १३ तालुक्यांच्या सर्व पंचायत समिती सभापतींची छायाचित्रे दिसत आहेत. छायाचित्र दालन या शीर्षकाखाली विविध कार्यक्रमांतील विविध नेत्यांची छायाचित्रे झळकत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका संकेतस्थळावर महापौर शकुंतला धराडे यांचे छायाचित्र झळकत आहे. नगरसेवक शीर्षकात नगरसेवकांचे छायाचित्र झळकत आहे. पीएमपी संकेतस्थळावर कार्यकारी मंडळात पुण्याचे महापौर म्हणून प्रशांत जगताप, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, पुणे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब बोडके, पिंपरी-चिंचवड स्थायी समितीचे अध्यक्ष हिराचंद आसवानी, तसेच संचालक आनंद अलकुंटे या लोकप्रतिनिधींची छायाचित्रे झळकत आहेत. (वार्ताहर )
लोकप्रतिनिधींची छायाचित्रे तशीच
By admin | Published: January 14, 2017 2:57 AM