कामशेत : या आठवड्यातील वीकेंडला आंदर मावळात पर्यटकांची मोठी गर्दी झाली. विशेषत: वडेश्वर,डाहुली, लालवाडी, बेंदेवाडी, खांडी आदी ठिकाणचे धबधबे गर्दीने फुलले होते. दिवसेंदिवस या परिसरातील पर्यटकांची गर्दी पाहता, पर्यटन विकासासाठी या परिसरात जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजचे झाले आहे. तसेच हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांना आवर घालणे गरजेचे आहे.
आंदर मावळाच्या निसर्ग सौंदर्याची भुरळ शहरातील पर्यटकांना जशी वाढली आहे, तशी मावळच्या ग्रामीण भागातील तरुणाई देखील वर्षाविहारासोबत धबधब्याखाली भिजण्याचा, ओढ्यात डुंबण्याचा आणि ठोकळवाडी जलाशयात पोहण्याचा आनंद घेत आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना होणे गरजेचे आहे. फळणे फाटा ओलांडून भोयरेमार्गे सावळ्याला आणि वडेश्वर मार्गे खांडीला निघाले, की वाहनातून जाताना अवघ्या चार-पाच मिनिटांच्या अंतराने पुढे आल्यावर निसर्गाचे विलोभनीय रूप न्याहाळत पुढे जाता येते. शनिवार, रविवार येथे वर्षाविहारासाठी पर्यटकांचे लोंढे येत आहे. डाहुलीजवळ दोन सिमेंट कॉँक्रीटचे साठवण बंधारे १९९८च्या सुमारास बांधले आहेत. याही बंधाºयात डुंबण्याचा आनंद घ्यायला शहरातील पर्यटक येत आहे.
पुणे, पिंपरी, चिंचवड या शहरासह उपनगरातील इतर भागातून गर्दी वाढत आहे. त्यापाठोपाठ वडगाव, तळेगाव, कामशेत, इंदोरी, चाकण, हिंजवडी या भागातून पर्यटक येत आहे. या सर्व पर्यटकांच्या येण्याने ग्रामीण भागात रोजगार वाढू लागला आहे. पण अतिहौशी पर्यटकांच्या धांदरटपणाने स्थानिकांना विनाकारण त्रासही सोसावा लागतोय. पर्यटकांनी थोडीशी जबाबदारीने वागले अथवा हुल्लडबाज पर्यटकांवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई केल्यास इतर पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्याचा आनंद हमखास घेता येईल. परंतु हुल्लडबाजांवर कारवाई होत नसल्याने अनेकांना जीव धोक्यात टाकावे लागतात.