पिंपरी : पिंपळे गुरव परिसरात ओंकार कॉलनी येथे रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या रिक्षा आणि चारचाकी वाहने अशा सात वाहनांची अज्ञात आरोपींनी तोडफोड केली. सहा जणांच्या टोळक्याने हातात कोयते घेऊन परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांनी वाहनांचेनुकसान केले. याविषयी वाहनचालकाने सांगवी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा जणांच्या टोळक्याने सोमवारी रात्री ओंकार कॉलनीत धुडगूस घातला. हातात कोयता घेऊन आलेल्या आरोपींनी दिसेल, त्या वाहनाची तोडफोड केली. आरडाओरडा करीत टोळके वाहनांचे नुकसान करून निघून गेले. शेखर चांदणे यांच्या मालकीच्या तीन वाहनांचे नुकसान झाले आहे. याशिवाय परिसरातील अन्य वाहनांचीही तोडफोड झाली आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात फिर्याद दाखल झाली आहे. सांगवी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. वाहन तोडफोडीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. वाहन तोडफोडीचे सत्र वर्षभरापासून सुरू आहे.विविध ठिकाणी वाहन तोडफोडीच्या घटना घडत आहेत. आॅगस्टमध्ये स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू झाले. त्यानंतर या घटनांना आळा बसेल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र आयुक्तालय झाल्यानंतरही या घटनांना आळा बसलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे.
पिंपळे गुरवला वाहनांची तोडफोड, दहशतीसाठी टोळक्याकडून रिक्षा व चारचाकींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 1:35 AM