रहाटणी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या व वाढती वाहन संख्या पाहता महापालिका प्रशासनाने या शहरातील रस्ते रुंद केले त्यामुळे तरी या रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी होईल, असे वाटत होते़ मात्र रस्ते रुंद झाले तरी सातत्याने वाहतूककोंडी होत आहे. शहरातील रस्त्यांवर बेवारस वाहने अडथळा ठरत आहेत. वर्षानुवर्षे एकाच जागेवर वाहने दिसून येत आहेत. या बेवारस वाहनांचे मालक कोण, असा प्रश्न शहरवासीयांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
पिंपळे सौदागर परिसरात ‘स्मार्ट सिटी’ योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र या परिसरातील रस्त्यांवर अनेक बेवारस वाहने पडून आहेत. रहाटणी चौक ते कोकणे चौक या प्रशस्त अशा रस्त्यावर दिवसभर व रात्रभर दुतर्फा अनेक वाहने अनधिकृतपणे पार्किंग केले जातात. त्यामुळे फक्त वाहनचालकांना एक लेनच वापरण्यासाठी मिळते ही अनधिकृत पार्किंग नेमकी कोणाच्या मर्जीने होते, कोणाचे आर्थिक हितसंबंध आहेत काय, हा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित होत आहे. या अनधिकृत पार्किंगवर पालिका प्रशासन व वाहतूक पोलीस कुठलीही कारवाई करत नाहीत. त्याचबरोबर या रस्त्यावर अनेक वर्षांपासून जीर्ण झालेली वाहनेदेखील आहेत.या ठिकाणी बेवारस वाहने नेमकी कोणाची, ही वाहने चोरीची आहेत की त्यांना मालक कोणी आहे हे देखील वाहतूक पोलीस तपासणी करीत नाहीत. त्यामुळे या वाहनांमुळे वाहनचालकांना मोठा अडथळा सहन करावा लागत आहे, अशीच परिस्थिती रहाटणी चौक ते राहटणी फाटा रस्त्यावर आहे. येथे उपाययोजनेची मागणी होत आहे.४पिंपळे सौदागर पोलीस चौकी ते पिके चौक या ४५ मीटर बीआरटीएस रस्त्याकडे येणाऱ्या मार्गावर शिवम् सोसायटीच्या बाजूला अनेक दिवसांपासून लावलेली चार चाकी वाहने अगदी सडलेल्या अवस्थेत आहेत. मात्र ही वाहने नेमकी कोणाची, असा प्रश्न आहे. याच रस्त्यावर आणखी एक चार चाकी वाहन आहे. या अनधिकृत पार्किं ग केलेल्या व बेवारस वाहनाच्या आडोशाला बसून काही रोडरोमिओ महिलांना छेडण्याचा प्रकारही या ठिकाणी अनेक वेळा घडलेला आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन महापालिका प्रशासन व वाहतूक विभाग यांनी यावर कठोर कारवाई करावी व ही वाहने नेमकी कोणाची याचा शोध लावून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.४बेवारस वाहनांमुळे पिंपळे सौदागर परिसराच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक सुरळीत करण्यावर पोलिसांकडून भर देण्यात येत आहे. मात्र बेवारस वाहनांकडे त्यांचे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते.