पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेचे राज ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पिंपरी - चिंचवड महापालिका प्रशासनाची हजेरी घेतली. 'शहरातील पर्यावरण प्रेमींची बाजू समजून घ्या आणि नंतरच नदी सुधार प्रकल्पाचे कामाचा विचार करा, अशी शब्दांत पवार यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना सूचना केल्या आहेत. शनिवारी तातडीची बैठक होणार आहे. पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्यांच्या सुधार प्रकल्पाचे काम अंतिम टप्यात आले आहे. तर मुळा आणि मुठा नदीच्या सुशोभीकरणाच्या सुमारे ४ हजार ७०० कोटींचा प्रकल्प सुरु झाला आहे. पिंपरी -चिंचवड शहरातील सीमेवर प्रत्यक्ष काम सुरु झाले आहे. त्यासाठी वृक्षतोड आणि नदीमध्ये भराव टाकण्याचे काम सुरु आहे. मुळा नदीबाबत पर्यावरणवादी आणि नागरिकांना विचारात न घेता निविदा काढून घाईघाईत काम सुरू केले. शहरातील संस्था, संघटनांनी एकत्र येत या विषयावर आंदोलने सुरू केल्यावर प्रशासन हादरले. बोगस सर्वेक्षणही सुरु आहे. सांगवी येथे ठेकेदाराच्या कार्यालयात बैठक बोलावून अर्ज भरून घेण्याचा डाव पर्यावरणवाद्यांनी उधळून लावला होता. तब्बल ४० संघटनांचे कार्यकर्ते एक झाले असून मानवी साखळी, जनजागृती आंदोलन दर रविवारी सुरू झाले आहे.
जेष्ठ पर्यावरण प्रेमी धनंजय शेडबाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पुण्यातील मोदी बागेत शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे, सिटीझन फोरमचे तुषार शिंदे, सामाजिक कार्यकर्ते बाबा भोईर, सागर चिंचवडे, कुस्तीगीर संघटनेचे संतोष माचुत्रे, पर्यावरणवादी शुभम पांडे, सामाजिक कार्यकर्ते डॉमनिक लोबो, विजय पोटकुले उपस्थित होते.तुषार कामठे म्हणाले, 'शरद पवार यांनी तब्बल पाऊन तास सर्वांचे मत ऐकूण घेतले. शेखर सिंह हे मनमानी करतात आणि प्रकल्पाची मागणी नसताना तो लादत जात असल्याचे गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर पवार यांनी आयुक्त शेखर सिंह यांना दूरध्वनी केला. पवार म्हणाले, 'पर्यावरण मित्रांचे मत का ऐकले जात नाही, परस्पर प्रकल्प कसे लादता, लोकांना विचारात घ्या.' त्यावर पुढच्या आठवड्यात वेळ द्यायचे आयुक्तांनी मान्य केले. महापालिकेत शनिवारी तातडीची बैठक होणार आहे.'