पिंपरी : कंपनीतून भंगार घ्यायचे असेल तर आम्हाला अगोदर पैसे द्यावे लागतील, असे म्हणत पाच ते सहा जणांच्या टोळक्याने खंडणी मागितली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. चाकण येथे गुरुवारी (दि. ३) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.
रामदास बबन गाडेकर (५०, रा. भोसे, ता. खेड) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. ४) चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. प्रज्वल कैलास मोहिते (२७, रा. मोहितेवाडी, चाकण), संकेत ऊर्फ माँटी नाणेकर (२७, रा. नाणेकरवाडी, चाकण), उसीउल्ला रुबाब खान (३८ रा. कुदळवाडी, चिखली), अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्यासह इतर दोन ते तीन संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामदास गाडेकर यांच्या कंपनीतील सुनील शिवराम राठोड हा व्हिक्टोरीया कंपनीत भंगार माल आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याला व फिर्यादी रामदास यांच्या कंपनीचा व्यवस्थापक गौरव पारसमल गादीया यांना संशयित मोहिते व नाणेकर व इतर दोन ते तीन जण व्हिक्टोरीया कंपनीत आले. भंगार माल घेऊन जाण्याचा ठेका आम्हाला मिळाला आहे. तुम्ही भंगार घेऊन जायचे नाही, असे म्हणत त्यांनी मोठ्याने शिवीगाळ करून धमकी दिली होती. तसेच गुरुवारी (दि. ३) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास फिर्यादी रामदास गाडेकर हे लक्ष्मी वजन काटा येथून व्हिक्टोरीया कंपनीत बिल घेण्यासाठी जात होते.त्यावेळी फिर्यादी रामदास गाडेकर यांच्या ट्रकसमोर दुचाकी आडवी लावून उसीउल्ला खान हा म्हणाला की, येथे कोणासही भंगार उचलण्याचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे असेल तर आम्हाला अगोदर पैसे द्यावे लागतील. तसेच फिर्यादी रामदास यांच्या ट्रकच्या समोरील काचेवर दगड मारत शिवीगाळ करत संशयित निघून गेले.