पिंपरी : बांगलादेशी महिलेसोबत विवाह करून तिला आश्रय दिला. तिचा पर्यटन व्हिसा संपल्यानंतर बांगलादेश येथे परत पाठवणे आवश्यक असताना, तिला पाठवले नाही. याप्रकरणी बांगलादेशी महिलेसह तिच्या पतीला अटक केली आहे. ही घटना ७ एप्रिल २०२२ ते २७ मार्च २०२५ या कालावधीत चिखलीतील कुदळवाडी येथे घडली.
मोहम्मद राणा मोहम्मद सलाम शेख (वय ३३, रा. तळवडे, मूळ - उत्तर प्रदेश) आणि त्याची पत्नी (वय ३०) यांना अटक केली आहे. त्यांच्यासह एक वर्षीय मुलावर गुन्हा दाखल आहे. आरोपी महिला मूळची बांगलादेशी नागरिक आहे. पर्यटन व्हिसावर ती भारतात आली होती. हे माहिती असताना आरोपी शेख याने तिच्याशी विवाह केला. त्यांना एक मुलगा आहे. महिलेची पर्यटन व्हिसाची मुदत ७ एप्रिल २०२२ रोजी संपली.
त्यानंतर बांगलादेशी महिलेला तिच्या देशात परत पाठवणे आवश्यक असताना, शेख याने त्याच्या घरात तिला आश्रय दिला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर चिखली पोलिसांनी बांगलादेशी महिलेसह तिला आश्रय देणाऱ्या तिच्या पतीला अटक केली.