हिंजवडी : हिंजवडी-माण रस्त्यालगत सध्या रस्ता रुंदीकरणाची प्रक्रिया जोरात सुरू आहे. मात्र, भूसंपादनासाठी स्थानिक जागा मालकांना विश्वासात घेतलं जात नसल्याने, ग्रामस्थांनी रस्ता रुंदीकरणास विरोध दर्शवला आहे. ‘वडिलोपार्जित आणि मालकी हक्काच्या जागा प्रस्तावित रस्त्यासाठी आम्ही द्यायला तयार आहोत मात्र, साहेब आधी मोबदल्याचं बोला, नंतर भूसंपादन करा.’ अशी भूमिका हिंजवडी-माण ग्रामस्थांनी घेतली आहे. याबाबत, परिसरातील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने नुकतीच पीएमआरडीए कार्यालयाला भेट यासंदर्भात निवेदन दिले आहे.
आपल्या विभागाकडून गेल्या काही दिवसांपासून हिंजवडी-माण रस्त्याच्या कडेला असलेली अनधिकृत दुकाने, शेड, घरे, कच्ची व पक्की कुंपणे हे निष्कासित करण्याचे काम सुरू आहे. आपणास सहकार्य म्हणून, परिसरातील बहुतांश नागरिक, स्वत:हून आपापल्या जागेतील बांधकामे काढून घेत आहेत. अनधिकृत बांधकाम काढण्याचा अधिकार आपणास आहे, परंतु अनधिकृत शेड काढण्याच्या नावाखाली स्थानिक जागा मालकांचे एकप्रकारे भूसंपादन सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे, रस्त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कायदेशीर भूसंपादन प्रक्रियेचा अवलंब करून, जागामालकांना विश्वासात घेऊनच प्रशासनाने जागा ताब्यात घ्याव्यात, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
येथील दैनंदिन वाहतूक कोंडीला स्थानिक ग्रामस्थ सुद्धा वैतागले आहेत. रस्ते प्रशस्त झालेच पाहिजे. मात्र, रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक असणारी जागा ताब्यात घेताना मूळ जागा मालकांना पूर्ण विश्वासात घेतलं पाहिजे, अशी आमची आग्रही मागणी आहे. -नागेश साखर, ग्रामस्थ, हिंजवडी