पिंपरी-चिंचवड : वेगासोबत स्पर्धा करणं एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची घटना घडली आहे. आपण किती सुसाट गाडी चालवत आहोत, हे इन्स्टाग्राम लाइव्हद्वारे आपल्या मित्रांना दाखवताना 21 वर्षीय शिवम जाधवला आपला जीव गमवावा लागला आहे. पिंपरी चिंचवडमधील हा धक्कादायक प्रकार आहे. वाहन चालवताना तब्बल ताशी 120 ते 140 किमीची वेगमर्यादा दाखवताना शिवम जाधवचा अपघाती मृत्यू झाला. रविवारी (13 मे) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.
शिवम आणि त्याचा चुलत भाऊ हृषिकेश पवार हे चिंचवडहून पिंपरीच्या दिशेने येत होते. तेव्हा हृषिकेशने शिवमच्या इन्स्टाग्रामवर लाइव्ह सुरू केलं. त्यावेळी शिवमने गाडीचा वेग ताशी 120 ते 140 किमीवर नेला. तोपर्यंत इन्स्टाग्राम लाइव्ह सुरूच होतं. यानंतर त्यांची गाडी पिंपरी ग्रेडसेपरेजटजवळ पोहोचली असता, शिवमचं गाडीवरील नियंत्रण सुटलं व गाडी डिव्हायडरवर जोरदार धडकली. या अपघातात शिवमचा जागीच मृत्यू झाला व हृषिकेश पवारला गंभीर दुखापत झाली.