लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : बनावट सरकारी मोजणीचा नकाशा बनविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या महापालिकेतील सर्व्हेअरवर निलंबनाची कारवाई केली आहे. त्याची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. सुभाष विठ्ठल खरात असे त्याचे नाव आहे. खरात हे महापालिकेच्या नगररचना व विकास विभागात सर्व्हेअर या जबाबदारीच्या पदावर कार्यरत आहेत. बनावट सरकारी मोजणीचा नकाशा बनविण्यामध्ये खरात यांचा प्रमुख सहभाग असल्याने त्यांच्यावर ४ जानेवारी २०१७ रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर, १७ जूनला त्यांना अटक करण्यात आली होती. तीन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर २० जूनला ते जामिनावर बाहेर आले असून, गुन्ह्याच्या तपास सुरू आहे, असा अहवाल पिंपरी पोलिसांनी पालिकेला सादर केला आहे.खातेनिहाय चौकशीखरात यांनी गैरवर्तन करून महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमाचा भंग केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार खरात यांना अटक केल्याच्या दिनांकापासून निलंबित केले असून, खातेनिहाय चौकशी सुरू करण्याचा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे. खरात यांना निलंबन कालावधीत अटी-शर्तीनुसार निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे.
पिंपरी पालिकेचा सर्व्हेअर निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 4:10 AM