पिंपरी : श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या स्विय्य सहायकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सायंकाळी साडेचारला रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत आज स्थायी समितीची सभा होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुपारी अडीचला आॅनलाईन सभा सुरू झाली. ती तासाभरातच संपली. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने सापळा लावला होता. सायंकाळी साडेचारच्या सुमारास स्थायी समितीचे स्वीय्य सहायक ज्ञानेश्वर पिंगळे यांना मुख्य इमारतीच्या पार्किंगमध्ये एका व्यक्तीकडून दोन लाख रूपयांची रक्कम घेताना पकडले. त्यानंतर एसीबीच्या सहायक आयुक्त अनिता सरग यांनी पिंगळे यांना फटके देत स्थायी समितीच्या कार्यालयात आणले. व तिसºया मजल्यावरील दालन बंद केले. तसेच महापौर, विरोधीपक्षनेता कक्षातील सर्वांना बाहेर काढले. सायंकाळी सव्वासातला चार जणांना एका गाडीतून नेण्यात आले. त्यानंतर काही वेळाने स्थायी समिती अध्यक्षांनाही चौकशीसाठी नेण्यात आले.
सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे नेमका तपशिल समजू शकला नाही. याबाबत राष्टÑवादी काँग्रेसने भाजपावर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधीपक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर मंगला कदम, वैशाली घोडेकर, माजी विरोधीपक्षनेते नाना काटे, माजी स्थायी समिती अध्यक्ष अजित गव्हाणे उपस्थित होते.
संजोग वाघेरे म्हणाले, ‘‘भय आणि भ्रष्टाचार मुक्त पिंपरी-चिंचवड असे अभिवचन देऊन भाजप सत्तेत आली. किती पारदर्शक आणि भ्रष्ट कारभार आहे, हे या कारवाईवरून दिसून येते.